खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली

दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती.त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना महागात पडले असल्याचे दिसत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याला रात्रभर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post