सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठणाचा राणा दांपत्यानं इशारा दिला होता. खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली आहे. त्यांना भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या  यांच्यावर हल्ला झाला असून, तो शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. यावर सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शिवसेना नेते व माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमय्या यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमय्यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केलेला नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, यावरून भाजपने आता थेट खार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.


राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला आहे. सोमय्या हे यात जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याबाबत सोमय्या म्हणाले की, मी जखमी असून, माझ्या कारमध्ये बसून आहे. माफिया सेनेच्या गुंडावर पोलीस कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत मी वांद्रे पोलीस ठाण्यासमोर कारमध्येच बसून राहणार आहे.खार पोलिसांनी राणा दांपत्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन काल केले. त्यावेळी राणा दांपत्य आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस राणा दांपत्यास वारंवार विनंती करत होते. त्यावेळी राणा हे पोलिसांना आमचे अटक वॉरंट दाखवा, अशी विचारणा करीत होते. त्यामुळे ते पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. पण पोलिसांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा यांना त्यांच्या खार येथील घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.

खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यामुळ राणा दांत्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होईल.

Post a Comment

Previous Post Next Post