आणि तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही..?,"

      शरद पवार यांची अमित शहाना टोला..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेची सांगता झाली. या सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दिल्लीत घडलेल्या घटनेवरून शरद पवारांनी थेट अमित शाह यांच्या टीकास्त्र डागलं.तसेच कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

शरद पवार म्हणाले, "एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. हा देश एकसंघ ठेवण्याचे आवाहन आहे. मागच्या काही दिवसात दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले, तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हाती असते. पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जागतिक स्तरावर जातो. आणि या देशात अस्थिरता आहे, अशी भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता आहे. आणि तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही..?,"  अशी टीका शाह यांच्यावर केली.


"दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात होतो. तेथील कार्यकर्त्यांनी सांगितलं की, हुबळीसारख्या ठिकाणी दंगे झाले. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये. त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जातायेत. मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देतो. देश अडचणीत असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करून आघाडीचा धर्म पाळला. हसन मुश्रीफ यांनाही धन्यवाद देतो," असं पवार म्हणाले.

"कोल्हापूरचे एक नेते आहेत चंद्रकांत पाटील. त्यांनी पोटनिवडणुकीत पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे सांगितले होतं. पण, कोल्हापूरकर हुशार आहेत. तुम्ही अतिशय चांगला 'निकाल' लावला. हा निकाल फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित नव्हता. तो संबंध देशाचा निकाल होता. देशात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय नेते आले आहेत. आतापर्यंत हे नेते आल्यानंतर दिल्लीत, मुंबईत जात होते. पण अलिकडे परदेशातले नेते येतात आणि गुजरातमध्ये जातात. अमेरिकेचे ट्रम्प, चीनचे अध्यक्ष यांच्यानंतर काल इंग्लंडचे पंतप्रधान गुजरातमध्ये गेले."

"गुजरातमध्ये गेले म्हणून आमची काही तक्रार नाही, पण आंतरराष्ट्रीय नेते देशातील इतर भागातही गेले पाहिजेत. जागतिक नेते एकाच भागात पाठवायचे काम केंद्र सरकार करत असेल तर तुमच्या मनातील भावना स्पष्ट दिसते. हा संकुचित विचार देशाच्या हिताचा नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते सुद्धा. सत्ता मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते. काही वर्षांपूर्वी ईडीचे नाव कुणाला माहीत नव्हते. पण आज ईडी, सीबीआय, आयटीचा गैरवापर सुरू असून त्याद्वारे विरोधकांना नामोहरम करण्याचे काम सुरू आहे," असं सांगत पवारांनी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पुर्नउल्लेख केला.

"केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादीचा आवाज दबेल, असा विचार करणारे मूर्खांच्या नंदनवनात आहेत. देशातील सर्व लोकशाहीवादी शक्तींनी विचार करण्याची गरज आहे. तरीही काही संघटना आणि पक्ष वेगळा विचार करत आहेत. त्यांनी टीका-टिप्पणी करावी. पण वस्तुस्थिती एक आणि टीका दुसरी करू नये. माझ्यावर आरोप केला गेला की, मी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव का घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव माझ्या अंतकरणात कोरलेले आहे. एका कठीण काळात छत्रपतींनी मोगलांच्या विरोधात लढून स्वराज्य निर्माण केले," असं पवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post