आशयसंपन्न गझलसादी मुशायरा



प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर ता.२७ गझलसाद संस्थेच्या वतीने मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा नव्वदावा जन्मदिन आणि गझलसादचा पाचवा वर्धापन दिन यानिमित्ताने बहारदार मुशायऱ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ गझलकारा प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांच्या अध्यक्षतेखाली करवीर नगर वाचन मंदिराच्या सभागृहात हा मुशायरा संपन्न झाला. या मुशायर्‍यात गझलकार प्रसाद कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे ,डॉ. दिलीप कुलकर्णी ,अशोक वाडकर ,प्रा.नरहर कुलकर्णी,प्रा.डॉ.सुनंदा शेळके, डॉ. स्नेहल कुलकर्णी ,डॉ. दयानंद काळे, प्रवीण पुजारी, सारिका पाटील, अरुण सुनगार, मनीषा रायजादे ,युवराज यादव,जमीर रेंदाळकर आदी गझलकारांनी आपल्या आशयसंपन्न गझला सादर केल्या.

डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी ' निर्मितीक्षम ताप असते ही गझल, लाघवी उशा:प असते ही गझल ' असे म्हणत गझलेची निर्मिती प्रक्रिया व त्यातून होणारे  समाधान व्यक्त केले. अशोक वाडकर यांनी  'माणसाचे माणसाशी वागणे नाही बरे, कायदा हातात घेणे -मोडणे नाही बरे ' या शब्दातून आजच्या सामाजिक - राजकीय वास्तवावर कोरडे ओढले.

 'सांगतो सर्वास मी माणूस माझी जात आहे, धर्म माझा ठेवला मी चौकटीच्या आत आहे ' अशा शब्दात प्रा.नरहर कुलकर्णी यांनीआजच्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले. प्रसारमाध्यमांच्या वापर व गैरवापराविषयी भाष्य करताना श्रीराम पचिंद्रे म्हणाले 'कवी लेखकू मांडत बसले इथे प्रदर्शन, कुणी कुणाचे श्रेय लाटतो फेसबुकावर '.

 'पाऊस गीत माझे ओठी धरून येतो, अंगावरी गुलाबी काटा भरून येतो ' या शब्दात प्रा. डॉ.सुनंदा शेळके यांनी पाऊस आणि प्रेम यांच्यातील नैसर्गिक अनुबंध उलगडून दाखवला. डॉ.स्नेहल कुलकर्णी जीवनातली उस्फुर्तता व्यक्त करताना म्हणाल्या '  विनोदाची लहर माझी खटकली नेमकी त्याला, असो.. प्रत्येक गोष्टीची मजा ठरवून येते का ? '. आयुष्यातल्या सानपणाचे महत्त्व सांगताना प्रवीण पुजारी म्हणाले' आयुष्य गीत गाता,गाईन मारवा मी,ना चंद्र ना प्रभाकर होईन काजवा मी '. 'पाय भाजले म्हणून वेग फार वाढला ,हात पोळले म्हणून घास गोड लागले ' या अतिशय सुंदर शब्दात अरुण सुनगार यांनी मानवी जीवनाचे वास्तव अधोरेखित केले.युवराज यादव यांनी ' मला वाटते या जगण्याला थोडी उंची द्यावी, ,आयुष्याच्या गोधडीसही चार इंची द्यावी 'असे म्हणत जगण्याची उंची वाढण्याचे महत्व स्पष्ट केले.

डॉ.दयानंद काळे यांनी 'अलिकडे ती भेटत नाही मनासारखी, उडून जाते उन्हातल्या त्या दवासारखी' या शब्दात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्या नात्यातील गोड तक्रार मांडली. मनीषा रायजादे यांनी ' तक्रार तरी कुणाकुणाची कुठे करावी कळेना, अंतरातले वादच आता सोसत आहे मनीषा ' या शब्दात मानवी मनाची उलघाल उघड केली.सारिका पाटील यांनी' अखंड कर तू माझ्यासंगे करार प्रेमाचा,हृदयावरती ताजमहल तू चितार प्रेमाचा ' या शब्दात प्रेमभावनेची सखोलता अधोरेखित केली.जमीर रेंदाळकर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगणारी गझल सादर केली.

 प्रसाद कुलकर्णी यांनी घाव सोसल्याशिवाय नाव होतं नाही हे सांगताना म्हटले ' मीच स्वतःचे पाय छाटले अनेकवेळा, उगाच नाही येथे ओळख बनली माझी ' या शब्दात मानवी जीवनातील महत्तेमागील सोसलेपण सांगीतले.मुशायऱ्याचा समारोप करताना गझलनंदा यांनी आपल्या विविध रसांच्या बहारदार गझला सादर केल्या. ' का देहही  नसावा माझ्याच मालकीचा, शामेस शाप होता पाचात वाटणीचा ' ते द्यूत खेळणारे कौंतेय पाच होते, तेथे बळी ठरावी शामाच सोंगट्याची.' तसेच ' हे माऊली मुलीला गर्भात ठेव तू, आहे भविष्य गर्भि हे  सांगायला हवे.. आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली, तिच्या पित्याला किमान आता बाई कळली.. यासारख्या आशयसंपन्न स्त्री उद्गारातुन सांगता केली. या मुशायर्‍याला साहित्य रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Post a Comment

Previous Post Next Post