नवाब मलिक यांना 4 एप्रिल पर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई: नवाब मलिक यांनी आज न्यायालयासमोर तीन अर्ज सादर केले होते. कमरेचा त्रास असल्यामुळे त्यांना झोपण्यासाठी बेड उपलब्ध करून देण्यात यावा तसेच चादर आणि बसण्यासाठी एक चेअर देण्यात यावी या मागण्यांचा अर्ज सादर केला होता न्यायालयाने आज या तिन्ही मागण्या मान्य करत जेल प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती 23 फेब्रुवारीला अटक केली. मलिक यांना 7 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यांनंतर त्यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका प्रकरणाचा तपास सुरु असताना मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आली होती. या नंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजप कडून नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अधिवेशनात देखील मलिक यांचा मुद्दा गाजला आहे अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला असून या आठवड्यात देखील नवाब मलिक यांचा मुद्दा गाजणार असून विरोधक मलिक यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे तर सत्ताधारी पक्ष विकास आघाडी राजीनामा घेणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post