बैलगाडी शर्यतींची सुरुवात शिरोळ तालुक्यातून झाली

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते या शर्यतीचा शुभारंभ व बक्षीस समारंभ पार पडला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

  कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतींची सुरुवात शिरोळ तालुक्यातून झाली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उमळवाड येथील मैदानावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते या शर्यतीचा शुभारंभ व बक्षीस समारंभ पार पडला.


बैलगाडी शर्यतींवरील बंदीमुळे अनेक वर्षांपासून शर्यती होत नव्हत्या. बंदी उठवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा शर्यतीमधील मालक आणि शौकिनांची भूमिका राज्य शासनाने प्रभावीपणे मांडली. त्यानंतर काही अटी व शर्तींसह सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती घेण्यासाठी परवानगी दिली. याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील मैदानावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आज पार पडलेल्या या शर्यतींमध्ये संयोजकांनी जवळपास दोन लाखांची बक्षिसे जाहीर केली होती. 'अ' गटातील स्पर्धेत निशिकांत बोंद्रे, हरिपूर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक उमेश कोळेकर आरेवाडी, तर तृतीय क्रमांक सचिन मोरे, जयसिंगपूर यांना मिळाला.

बिनदाती बैलजोडीमध्ये प्रथम क्रमांक दिनकर चौधरी, हरिपूर, द्वितीय क्रमांक संदीप पाटील, तासगाव, तर तृतीय क्रमांक संदीप माने, दानोळी यांच्या बैलजोडीला मिळाला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून किमान 50 हजार शर्यतशौकीन यावेळी उपस्थित होते. शर्यती कमिटीचे प्रमुख विद्याधर कर्वे, सचिन भवरे, प्रभाकर चौगुले, रमेश चौगुले आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या उमळवाड येथील कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. यावेळी संजय पाटील-यड्रावकर, संभाजी मोरे, माजी नगरसेवक राहुल बंडगर, जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश लठ्ठे, शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे, संजय नांदणे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post