अर्ध्या हळकुंडाने शिवसेनेला पिवळे होण्याची घाई

 


प्रेस मेडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


चिरीमिरीच्या नादात खोटे आरोप करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहेत, त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने शिवसेनेला पिवळे होण्याची घाई लागली आहे. असा सणसणीत टोला घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद पाटील यांनी शिवसेनेच्या कथित आरोपावर लगावला आहे. घोट गावातील जमिनी संदर्भात बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा यांच्यावर आरोप करताना कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना नाहक बदनाम करण्याचा कुटील डाव शिवसेनेकडून आखण्यात येत आहे. त्या कुटील डावाचा बुरखा फाडत विनोद पाटील यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.  

          या संदर्भात पुढे बोलताना विनोद पाटील यांनी म्हंटले कि, घोट गावामध्ये श्री. भालेराव यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नावावरती बांधलेल्या प्रकल्पामध्ये ग्रामस्थांनी बांधलेली घरे बाधित होत असल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आम्ही गेलो असता त्यांनी महानगरपालिकेच्या मार्फत सदर शेतकऱ्यांना त्या वेळेला गेलेल्या अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती. आणि सदर शेतकऱ्यांनी बांधलेली घरे हि कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जागेच्या आदेशा आधी दिलेली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास  भारतीय जनता पार्टीचा विरोध राहील हे तालुका भूमिलेख अधिक्षक तसेच महापालिकेला निक्षून सांगितले आहे. भारतीय जनता पार्टी, माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये एकही भ्रष्टाचार सिद्ध होऊ शकला नाही. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे चालू धंदे हे सर्वानाच माहित पडले आहेत. आणि त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सर्व घोटाळे खणून काढणारे माननीय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी अजिबात करू नयेत. व स्वतःच्या घरात डोकावून बघावे, भ्र्रष्टाचाराला विरोध करायला त्यांना अनेक प्रकरणे भेटतील. 

             मनीष भतीजा यांच्यावर आरोप करताना कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिवसेनेने आपल्याकडे आलेल्या तक्रारदाराला खोटी दिशा दाखवून तक्रादारची दिशाभूल करणे होय. कारण आमदार प्रशांत ठाकूर हे अन्याय करणाऱ्याला कधीच साथ देणार नाही. याची पनवेल तालुक्याला पूर्णपणाने खात्री आहे. मात्र मनीष भतीजा असोत किंवा श्री. भालेराव किंवा इतर उद्योजकांच्या मार्फत  स्थानिकांवर, शेतकऱ्यांवर जेव्हा केव्हा अन्याय झाला त्यावेळी  उद्योजकांच्या विरोधात आणि स्थानिक, शेतकऱ्यांच्या बाजूने आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच उभे राहिले आहेत. मात्र अशा उद्योजकांडून आपल्याला काही तरी चिरी मिरी मिळेल या आशेपोटी शिवसेनेचे नवे निर्माण झालेले नेते हे कधीच्या काळी आलेल्या तक्रादाराला खोटे भरवसे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी लढताना भारतीय जनता पार्टी हि शिवेसनेला अपेक्षित असलेली चिरीमिरी मिळवण्याचे प्रयत्न उधळवून लावतील आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना न्याय मिळवून देतील अशीही खात्री माजी सरपंच विनोद पाटील यांनी बोलताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post