माणुसकी अजून शिल्लक आहे-शरद पवार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

या देशाच्या इतिहासामध्ये 1884-85 साली या काळामध्ये एक प्लेगचे संकट आले होते. या पुणे शहरामध्ये त्या प्लेगमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि एवढे मोठे संकट देशात कधीच आले नव्हते, अशी चर्चा त्या जुन्या लोकांमध्ये आहे. मला स्वतःला त्याची माहिती असल्याचे काही कारण नाही. माझा जन्मही झाला नव्हता. मला एक गोष्ट माहिती आहे 1885 साली काँग्रेस पक्षाचा जन्म झाला स्थापना झाली. ती स्थापना पुणे शहरात होणार होती, पण प्लेगचे संकट आला महणून पुण्यात तो स्थापनेच्या संबंधीचा निर्णय बदलावा लागला. मुंबई मध्ये ज्याला आज आपण गोवालियार टॅंक म्हणजे आज ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो तिथे झाले. हे एक मोठे संकट देशावर आलेले होते आणि त्यावेळेस वेगळा इतिहास घडला.

या वेळी सुद्धा कोरोनाचे संकट आहे. ते अधिक घातक आहे असे दिसते आहे. कारण त्याची व्याप्ती संपूर्ण विश्वावर आहे. अमेरिका सारख्या प्रगत देशांमध्ये अक्षरश: काही लाख लोक मृत्युमुखी पडले. आपल्या इथेही दुर्दैवाने जबरदस्त धक्का भारतीय जनतेला बसला.या काळात जे वृत्तचित्र यायचे की, अनेक लोक मृत्युमुखी पडले. कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या लोकांची स्थितीही गंभीर आहे आणि असे असताना कुटुंबातील लोकसुद्धा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नव्हते. असे कधीही घडलेले नव्हते. पण कोरोनाची भीती समाजामध्ये होती आणि त्यामुळे साहजिकच एक चिंतेचे वातावरण होते. 

नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांमार्फत अंत्यसंस्कारांबाबत काही काम केले जात असे. पण कोरोनामुळे कोणाच्या कुटुंबामध्ये, कोणाच्या घरामध्ये काही मृत्यू झाले तर नंतर आजूबाजूच्या , शेजारच्या सुद्धा घरातील लोक पुढे येत नसत अशी एक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळेला पुणे शहरामध्ये एक संस्था चालवणाऱ्या मुस्लिम समाजातील काही सहकाऱ्यांनी कोरोनाच्या मृत्यूनंतर जी हताश स्थिती आहे त्याची नोंद घेतली. कुटुंबातील लोक येवोत न येवोत पण त्यांचा अंत्यसंस्कार करणे ही मानवतेची सेवा करण्याच्या संदर्भाचा एक भाग आहे हा विचार त्यांनी स्वीकारला. कुठेही, पुणे शहराच्या परिसरामध्ये अशी व्यक्ती मेली तर तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या भाषेचा आहे याचा अजिबात विचार न करता पुण्यामध्ये या सगळ्या सहकारी बांधवांनी एक महत्त्वाचे काम केले. त्या कामातून मृत्यू झाल्यानंतरही मानवतेची  सेवा कशी करता येईल याचे आदर्श त्यांनी दाखवले.

एकट्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्या कालखंडामध्ये जवळपास तीन हजारपेक्षा अधिक मृत्यू पडलेल्या लोकांना त्यांचा अंत्यविधी करणे व ते अंत्यविधीची जबाबदारी घेत असताना त्या कुटुंबीयांना ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गेली त्यांना एका नव्या पैशाची सुद्धा चिंता वाटू नये याची काळजी घेऊन पदरमोड करून हे सगळे अंत्यविधी करणे अत्यंत महत्त्वाचे काम केले.

 एका प्रकारे मानवतेची सेवा करण्याचे उत्कृष्ट उदाहरण हे पुणेकरांनी दिले. जे काही त्यांनी करून दाखवले माझ्या मते संबंध देशपातळीवर त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याचा आदर राखला पाहिजे. अंत्यसंस्कार करण्याच्या पाठीमागे या सर्वांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता, कसली अपेक्षा नव्हती. एक माणुसकीची भूमिका आणि समाज संकटात असताना त्या संकटग्रस्तांना, कुटुंबियांना हातभार लावणे, मदत करणे एवढा एकमेव दृष्टिकोण या ठिकाणी ठेवला गेला. त्यामधूनच ही सेवा त्यांनी केली. 

हे सगळे सेवेकरी यांच्या स्वयंसेवेमुळे ते आम्हा लोकांच्या मनात कायम राहतील. त्यांनी जे काही काम केले ते अलौकिक अशा प्रकारचे काम होते आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या योगदानाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात आदर्शाचे स्थान असेल. माझी खात्री आहे की पुणेकरांच्या मनात सुद्धा आदर्शाचे स्थान असेल. 

 कुठली जात-पात धर्म भाषा याचा विचार न करता अंत्यविधीची सेवा हातामध्ये घेऊन हे कठीण काम करण्याचा आदर्श याठिकाणी केला. मला आनंद आहे त्या सर्व कामाच्या संबंधाचा लेखाजोखा अंजुम इनामदार लिखित पुस्तक ' कोरोना मृत्यूनंतर..... नाते मानवतेचे ' पुस्तकात आहे. संदेश प्रकाशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेले हे पुस्तक तुमच्या सर्वांच्या साक्षीने याचे प्रकाशन झाले असे या ठिकाणी जाहीर करतो.

 माझी खात्री आहे पुस्तक वाचल्यानंतर समाजाच्या फार मोठ्या घटकाला माणुसकी अजून शिल्लक आहे, या संबंधीचे एक उचित असे चित्र बघायला मिळेल व समाधान झाल्याशिवाय राहणार नाही.दीनांक 14/02/2022 रोजी मोदी बाग पुणे पद्मविभूषण श्री. पवार साहेबांच्या निवास्थानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, अमजद शेख, सलीम शेख, आसिफ शेख, जुबेर मेमन, निसार शेख, जुबेर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना आजाराने पुण्यात प्रथम रुग्ण दगावला होता. 28 कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या दिवसापासून तर आज वीस महिने होत आहे सदर संस्थेचे काम सुरू आहे.




Post a Comment

Previous Post Next Post