हडपसर : उड्डाणपूल दुरूस्तीचे काम आज चौथ्या दिवशीही कासवाच्या गतीने

 हडपसर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

जीलानी (मुन्ना )शेख :

पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल दुरूस्तीचे काम आज चौथ्या दिवशीही अतिशय संथगतीने सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पूल केवळ अवजड वाहनांसाठी बंद करण्याऐवजी सर्वच वाहतूक बंद करण्यात आल्याने हडपसर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.


आज, सलग चौथ्या दिवशी पुणे-सालापूर महामार्ग, हडपसर-सासवड मार्ग, मगरपट्टा चौक तसेच गाडीतळ चौक अक्षरश: कोंडला होता. हडपसर गाडीतळ येथे दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. एक विंग पुण्याहून सोलापूरच्या दिशेने तर दुसरी विंग फुरसुंगी-सासवड रस्त्याला जोडते. उड्डाणपूल हलत असल्याने बेअरिंगची दुरुस्ती करण्यासाठी पुलावरून अवजड वाहने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, अवजड वाहने पुलाखालून जाण्यासाठी महापलिकेने अतिक्रमणे तसेच सायकल मार्ग हटवून रस्ता रूंदीकरणही केले होते. त्यानंतर शुक्रवारी उड्डाणपुलाची पाहणी तज्ज्ञांनी केल्यानंतर दुपारी उड्डाणपुलावरून अचानक सर्वच वाहतूक बंद करण्यात आली.

याबाबत वाहतूक विभागाला माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. उड्डाणपूल दुरूस्ती दोन दिवसांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, आज चौथ्यादिवशीही काम अतिशय संथगतीने सुरू होते, त्यामुळे पुलावरून वाहतूक बंदच होती. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर आकाशवाणी, 15 नंबरपर्यंत, सासवड रस्त्यावर भेकराईनगरपर्यंत तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर किर्लोस्करपुलापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लांगल्या होत्या. पुलाची दुरूस्ती तातडीने करावी, धोका नसल्याने किमान हलकी वाहने पुलावरून सोडावीत, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post