ट्रान्सफर स्टेशनचा उभारण्यासाठीखर्च 39 कोटींवर



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

 पिंपरी-चिंचवड शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत. कचरा संकलनाकरिता हे ट्रान्सफर स्टेशन उभारण्यासाठी स्थापत्य विषयक कामांकरिता दोन स्वतंत्र निविदाप्रक्रीया राबवून दोन ठेकेदारांना 21 कोटी 18 लाख रूपये खर्चाचे काम देण्यात आले आहे.

आता हे ट्रान्सफर स्टेशन उभारण्यासाठी मशिनरी व विद्युतविषयक कामे करण्याकरिता 17 कोटी 85 लाख रूपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे ट्रान्सफर स्टेशनचा खर्च 39 कोटींवर पोहोचला आहे. उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे 25 ते 30 ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील ब-याच भागातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

हवेचे प्रदुषणही होते. लिचेटची गळती रस्त्यावरून होते. तसेच दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. हे टाळण्यासाठी महापालिकेने इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्तांच्या 17 सप्टेंबर 2021 रोजीच्या मान्य प्रस्तावानुसार कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, थेरगाव येथील एम. एम. शाळेजवळील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर 23 - निगडीतील गायरान जागा, भोसरी-नेहरूनगर एमआयडीसी जे ब्लॉकमधील मोकळी जागा या ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे. या ट्रान्सफर स्टेशनसाठी स्थापत्य विषयक कामे बीआरटीएस विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने या कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. भोसरी-नेहरूनगर एमआयडीसी जे ब्लॉकमधील मोकळी जागा आणि सेक्टर 23 - निगडीतील गायरान जागेत कचरा संकलनाकरिता ट्रान्सफर स्टेशन उभारण्यासाठी कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला निविदा दरापेक्षा 15.30 टक्के जादा म्हणजेच 9 कोटी 50 लाख रूपये खर्चाचे काम देण्यात आले.

तसेच कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राजवळ, सांगवी स्मशानभुमीजवळ आणि थेरगाव येथील एम. एम. शाळेजवळील स्मशानभुमीजवळील जागेत कचरा संकलनाकरिता ट्रान्सफर स्टेशन उभारण्यासाठी अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला निविदा दरापेक्षा 16.85 टक्के जादा म्हणजेच 11 कोटी 67 लाख रूपये खर्चाचे काम देण्यात आले. या संपूर्ण स्थापत्य कामांसाठी एकूण 21 कोटी 18 लाख रूपये खर्च होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post