पिंपरी-चिंचवड : भाजप मधील गळती थांबेना....

  सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनाच पुढाकार घेण्याची वेळ आली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अनवरअली शेख

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधून नगरसेवकांचे बाहेर पडणे सुरू झाल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक लक्ष घालण्याची वेळ आली आहे.

भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या पाठोपाठ चंदा लोखंडे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा देत भाजपला दुसरा धक्का दिला. यापूर्वी नगरसेवक रवी लांडगे नगरसेविका माया बारणे यांच्यासह भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या प्रवेशाचा मनोदय स्पष्ट केला आहे.

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप या दोन प्रभावशाली स्थानिक नेत्यांकडे गेली पाच वर्षे पक्षाचे नेतृत्व आहे. नगरसेवकांची गळती रोखण्यात अजून तरी त्यांना यश न आल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पक्षाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी पक्षांतराच्या मानसिकतेत असलेल्या नगरसेवकांना रोखण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक लक्ष घालावे लागले आहे. पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या 12 नगरसेवकांनी फोन करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. त्यावेळी या नगरसेवकांनी स्थानिक नेतृत्वाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील महापालिका निवडणुकीत 'नको बारामती, नको भानामती'चा नारा देत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देत शतप्रतिशत भाजपाचं स्वप्न साकार प्रत्यक्षात उतरवले. 'तोडा फोडा आणि राज्य करा' या नीतीचा वापर करीत राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना भाजपामध्ये घेऊन महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली.

स्थानिक पातळीवरील निर्णय हे जागेवरच आणि तात्काळ घेण्यासाठी अजित पवारांना सत्तेपासून बाजूला करण्यात आले. दोन आमदारांच्या हाती सगळी सूत्र आणि निर्णयाचे अधिकार देण्यात आले. शहराचा गाडा शहर पातळी वरच हाकण्यात येऊ लागला. भोसरी आणि चिंचवडमधील नगरसेवकांना पदे मिळाली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक वंचित राहिले.सुरूवातीला सर्व काही आलबेल सुरु होते, परंतु महापालिका स्वीकृत सदस्यांचा निर्णय शहरपातळीवर एकमत न झाल्याने थेट वरिष्ठ पातळींवर ठरवण्यात आला होता.त्यामुळे निर्णयाच्या अधिकारावर मर्यादा असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून भाजप मधील असंतुष्ट नगरसेवकांच्या मनातील खदखद बाहेर येऊ लागली. दबक्या आवाजात बोलणारे भाजपा नगरसेवक आता खुले आव्हान देऊ लागले आहेत. काम नगरसेवकांनी करायची आणि श्रेय आमदारांनी घ्यायचे, या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये संताप आहे.काम करताना कोणत्याच गोष्टीत स्वातंत्र्य नव्हते इथपासून भाजप नेत्यांनी अन्याय केला विकासापासून वंचित ठेवले अशी भाषा वापरून दोन्ही आमदारांच्या मनमानी कारभारणीला कंटाळून भाजपाचा राजीनामा दिला, अशी नगरसेवकांमध्ये चर्चा आहे. पाच वर्षाच्या कालावधीत शहराच्या विकासाबरोबरच नगरसेवकांना न्याय देण्यातही भाजपाचे दोन्ही आमदार कमी पडले का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

नगरसेवकांना पक्षात थोपविण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुढाकार घेण्याची वेळ आली. पक्ष सोडणा-या आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या नगरसेवकांना तुमच्या वरील अन्याय दूर केला जाईल, परंतु वेगळा विचार करू नका, असे साकडे घालायची वेळ फडणवीस यांच्यावर आली आहे. फडणवीस यांच्या शिष्टाईला कितपत यश मिळते, यावरच भाजपचे आगामी निवडणुकीतील यश अवलंबून असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post