हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला भीषण आग लागली

आगीत अनेक छोटी-मोठी वृक्ष जळून खाक झाली.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोल्हापूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हातकणंगले  तालुक्यातील आळते गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला भीषण आग  लागली आहे.या डोंगराचा सुमारे दोनशेहुन अधिक एकरचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला आहे. या आगीत आतापर्यंत जवळपास चाळीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र डोंगरावर भ्रमंतीसाठी आलेल्याच एखाद्या व्यक्तीकडून आग लागली असावी असा अंदाज आहे. आगीची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग डोंगरावर लागल्याने पाणी  देखील मिळू शकले नाही, तसेच वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग अधिकच भडकली. या आगीत अनेक छोटी-मोठी वृक्ष जळून खाक झाली आहेत.


200 एकर परिसराला आग

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील आळते गावात असलेल्या एका डोंगराला आग लागली. या डोंगराचा तब्बल 200 एकरचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला. याच डोंगराच्या परिसामध्ये अल्लमप्रभुंच पुरातण मंदिर देखील आहे. या डोंगरावर गवताचे उत्पन्न घेतले जाते. आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक या डोंगराला आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग भडकल्याने डोंगर परिसरात ही आग पसरली या घटनेत आतापर्यंत जवळपास चाळीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आग लागल्याच समजताच अल्लमप्रभु मंदिराचे पुजारी किरण वडेर, तुषार वडेर, प्रमोद वडेर, चंद्रकांत वडेर, संतोष वडेर यांच्यासह स्थानिकांनी डोंगराकडे धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही आग डोंगरावर लागल्याने पाणी देखील उपलब्ध झाले नाही. त्यामुळे झाडांच्या फांद्यानी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र डोंगरावर गवत असल्याने ही आग अद्यापही अटोक्यात आणण्यात यश आलेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post