प्रा . डॉ.एन.डी. पाटील हे आज वयाच्या त्र्याणव्या वर्षी कालवश झाले.

 एन.डी.सर गेले एका युगाचा अंत झाला...



कोल्हापूर ता. १७ महाराष्ट्रातील प्रबोधन ,पुरोगामी, परिवर्तनवादी , कष्टकरी , शेतकरी ,कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते,रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा डॉ.एन.डी. पाटील हे आज वयाच्या त्र्याणव्या वर्षी कालवश झाले. उद्या मंगळवार ता. १८ जानेवारी रोजी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार )  मैदानावर सकाळी ८  ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. तसेच एन.डी.सर समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन  प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडा शिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे.कोरोनाच्या नियमांमुळे केवळ वीस लोकांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे.तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये आवाहन तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग ,आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे असे आवाहन एन.डी.सरांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.


प्रतिकिया......

एन.डी.सर गेले एका युगाचा अंत झाला.एन.डी.सर समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली छत्तीस वर्षे मी प्रबोधिनीचे काम करत आहे. सरांच्या लेखनातील,भाषणातील प्रत्येक वाक्य शिकण्यासारखे असायचे.एवढेच नव्हे तर त्यांचे सानिध्यही मोठी शिकवण देत होते. त्यांच्या विषयीच्या शेकडो आठवणी आहेत. त्यांना माझ्या सातत्यपूर्ण कामाबद्दल असलेला विश्वास,खात्री,जिव्हाळा आणि  त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक अशी गेली अनेक वर्षे माझी सर्वदूर असलेली ओळख ही माझी फार मोठी कमाई होती.अलीकडे सरांना विस्मरण व्हायचे.त्यांना माणसे ओळखू येत नसत .पण त्याही वेळी ते मला ओळखत असत.त्यावेळी अनेकदा डोळ्यात आलेलं पाणी लपवू शकलो नव्हतो. गेल्या  चवेचाळीस वर्षात समाजवादी प्रबोधिनीच्या अगणित कार्यक्रमांना एन.डी.सरांनी मार्गदर्शन केले. समाजवादी प्रबोधिनीचा कार्यक्रम हा त्यांच्या नेहमीच अग्रक्रमाचा विषय होता. सरांना कार्यक्रमासाठी फोन केला आणि सरांनी नाही म्हटले असे कधीही झाले नाही. शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? पश्चिम जर्मनीतील समाजवादी लोकजीवन, अपेक्षित महात्मा विठ्ठल रामजी शिंदे  आदी एन.डी.सरांनी लिहिलेल्या पुस्तिका सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केल्या होत्या.सतत फिरती आणि कमालीची व्यस्तता असूनही सरांचा समाजवादी प्रबोधिनीसाठीचा अग्रक्रम हा माझ्यासाठी व प्रबोधिनीच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता.

 महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.एन.डी. पाटील.अथक परिश्रम करणाऱ्या सरांच्या शब्दकोशात थकणे हा शब्दच नव्हता.अविश्रांत वाटचाल आणि  एन.डी. हे समानार्थी शब्द आहेत.त्यांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांपैकी अखेरचा व सर्वात बुलंद आवाज प्रबोधिनीने गमावला आहे.त्यांचे विचारकार्य अधिक जोमाने करीत राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.समाजवादी प्रबोधिनी परिवाराची त्यांना विनम्र आदरांजली.


                प्रसाद माधव कुलकर्णी,

                     सरचिटणीस

          समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी

                 ( ९८ ५०८ ३० २९०)

Post a Comment

Previous Post Next Post