श्री दत्त साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू

 राज्यात वेतनवाढीचा करारनामा करणारा पहिला कारखाना  : गणपतराव पाटील

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

शिरोळ/प्रतिनिधी:

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळ साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ १ नोव्हेंबर, २०२१ पासून लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी जाहीर केला व तसा करार कारखाना व शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक) शिरोळ या उभयतांमध्ये करण्यात आला. राज्य स्तरावर शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने शिफारस केल्याप्रमाणे सदरची १२ टक्के वेतनवाढ लागू करणारा श्री दत्त साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना आहे. हंगामी कायम व वेतनश्रेणीत पगार घेत असलेल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सद्याच्या वेतनावर १२ टक्के वेतनवाढ लागू करण्यात

आली आहे. कारखाना व्यवस्थापन व कामगार कर्मचारी यांचे संबंध नेहमी सलोख्याचे, सौहार्दपूर्ण व एकमेकास पूरक असे राहिले असून व्यवस्थापनामार्फत सुरुवातीपासूनच कामगार हिताची धोरणे राबवली जात असल्यामुळे कर्मचारीवर्ग नेहमीच समाधानी राहीला आहे. तसेच कामगार कर्मचारीसुध्दा प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा करुन आपले योगदान देत आहेत. आज राज्यातीलच नव्हे तर देशातही सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात श्री दत्त साखर कारखान्याचा नावलौकीक आहे. कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे असे गणपतराव पाटील यांनी वेतनवाढ करार करताना सांगितले. करारानुसार कामगारांना १ नोव्हेंबर २०२१ पासून वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. 

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सर्व खाते प्रमुख, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदिप बनगे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील बोलताना म्हणाले, कारखाना चालू झाल्यापासून सभासद शेतक-यांना एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम विनाकपात सभासदांच्या खात्यावर ज्या त्या वेळी वर्ग केली जात आहे. ऊस तोडणी व ऊस वाहतूकीची बिले ज्या त्या वेळी अदा केली असून कारखाना आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे. या कारखान्याच्या कामगारांचाही १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय घेऊन तो करारनामा करुन अंमलात आणला आहे. कारखाना अत्यंत जोमाने सुरु आहे. सर्व सभासदांनी

आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post