शिर्डीत प्लॅस्टिक साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

आगीचे कारण समजू शकले नाही.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 नगर-मनमाड महामार्गालगत असणाऱ्या प्लॅस्टिक साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शिर्डीत घडली. दरम्यान, शेजारी असलेली युनियन बँक व एटीएम सेंटर थोडक्यात बचावले आहे.शिर्डी येथे नगर-मनमाड रस्त्याच्या लगत युनियन बँकेच्या शेजारी चांगदेव कसबे यांचे 'ओम साई ट्रेडर्स' नावाने दुकान असून, प्लॅस्टिक मटेरियलसह हॉटेल मटेरियल आणि लग्न समारंभासाठी लागणाऱया विविध वस्तूंची विक्री केली जाते. रात्री 11च्या सुमारास या दुकानाला आग लागली. दुकानातील प्लॅस्टिक मटेरियलमुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातून स्फोट झाल्यासारखे आवाज येऊ लागल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या दुकानाच्या बाजूलाच युनियन बँकेचे एटीएम मशीन व इमारतीत युनियन बँकेची शाखा, तसेच हॉटेल्स आणि रहिवासी परिसर असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र, शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान, तसेच राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडय़ा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीचे कारण समजू शकले नाही.

'फायर सेफ्टी'चा मुद्दा ऐरणीवर

शिर्डीत मोठय़ा प्रमाणावर हॉटेल्स, लॉजिंग, रहिवासी इमारती, तसेच विविध बँका आहेत. मात्र, अनेकजण 'फायर सेफ्टी ऑडिट'च्या बाबतीत दुर्लक्ष करीत असून, अनेकांचे ऑडिट झाले नसल्याने ही बाब मोठय़ा दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते. स्थानिक राहिवाशांसह साईभक्तांची सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने 'फायर सेफ्टी'साठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post