शिर्डी ग्रामस्थांनी घेतला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

 प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 नगरपरिषद व्हावी  या साठी शिर्डी नगरपंचायत 2021च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.


शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 डिसेंबरला मतदान, तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत बहिष्काराबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भाजपचे राजेंद्र गोंदकर, ज्येष्ठ नेते कैलासबापू कोते, काँग्रेस नेते तथा साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, नीलेश कोते, सचिन तांबे, सचिन शिंदे, गजानन शेर्वेकर, अभयराजे शेळके, अशोक गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, ऍड. अनिल शेजवळ, मंगेश त्रिभुवन, नितीन उत्तम कोते, दत्तात्रय कोते, संजय शिंदे, विजय जगताप, सचिन कोते, अरविंद कोते, सुनील गोंदकर, दादाभाऊ गोंदकर, ताराचंद कोते यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषंगाने सन 2016 मध्ये नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन नगरपरिषद करण्यासंदर्भात निकाल झाला होता. परंतु, त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. सध्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली प्रभागरचना चुकीची व अयोग्य असून, मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप बैठकीत ग्रामस्थांनी केला. मागासवर्गीय बहुल अर्थात जास्त मतदार संख्या असलेल्या प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. मागासवर्गीय मतदार संख्या अत्यल्प व सर्वसाधारण मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी राखीव संवर्गाचे आरक्षण पडले आहे. हा विरोधाभास असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, जोपर्यंत शासन शिर्डी नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असून, कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल करणार नाही, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली. दरम्यान, कालपासून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post