ओमायक्रोन रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर

 राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू...

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 निर्बंधांचे स्वरूप हे प्राथमिक असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे.उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यात उद्यापासून सुरू होणारा नाताळ सण आणि कोरोना-ओमायक्रोन रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच अन्य सोहळ्यांतील उपस्थितीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबईत न्यू इयर पार्टीवर बंदी

ओमायक्रोनचा वाढलेला धोका लक्षात घेता मुंबईत नववर्ष पार्टी सेलिब्रेशनला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यानुसार बंदिस्त किंवा मोकळय़ा जागेत गर्दी जमणाऱया कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

हॉटेल आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी नाही

नाताळ आणि नववर्षानिमित्त हॉटेल, शाकाहारी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि परमिट रूम पहाटे 5 पर्यंत उघडे ठेवण्याची विनंती इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोशिएशनने केली होती. मात्र गृहविभागाने ही विनंती अमान्य केली आहे.

ओमायक्रोनवर पॅरासिटेमॉल ठरतेय गुणकारी

हिंदुस्थानात ओमायक्रोनची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असतानाच दिलासादायक माहिती पुढे आली आहे. ओमायक्रोन बाधितांवर पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. दिल्लीमधील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱया ओमायक्रोन बाधितांवर सध्या पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्स या गोळ्यांच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत. रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घेणाऱया 40 पैकी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील एकूण रुग्ण संख्या 108

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात दिवसभरात 20 नवे रुग्ण सापडले. मुंबईत सर्वाधिक 11 तर पुण्यात 6, सातारा 2, नगरमध्ये 1 रुग्ण आढळून आला. यामुळे राज्यातील ओमायक्रोन रुग्णांची एकूण संख्या 108 वर पोहचली आहे. राज्यात आज नव्याने आढळून आलेल्या 20 रुग्णांपैकी 15 आंतरराष्ट्रीय प्रवासी, 1 आंतरदेशीय प्रवासी. तर 4 जण त्यांचे निकटसहवासित आहेत. यातील 12 जणांचे पूर्ण लसीकरण झालेले असून 7 जणांचे लसीकरण झालेलं नाही. 1 रुग्ण हा 18 वर्षाखालील असून लसीकरणास पात्र नाही. दरम्यान राज्यात दिवसभरात 1410 कोरोनाबाधितांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदी

लग्नसमारंभ, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपस्थितांची संख्या 100 आणि खुल्या जागेत 250च्या वर नसेल उपाहारगृहांमधील 100 टक्के उपस्थिती 50 टक्क्यांवर आणली जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाटय़गृहे येथे क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती

Post a Comment

Previous Post Next Post