तळेगाव : चुलत भावाने त्याच्या मित्रा सोबत मिळून निर्घृणपणे खून केल्याचे उघड.

 गुन्ह्याचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी छडा लावला ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस

तळेगांव दाभाडे दि २४.  घटना गुरुवारी मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली होती. या गुन्ह्याचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी छडा लावला आहे.चुलत भावाने त्याच्या मित्रासोबत मिळून चुलत भावाचा हातोडीने डोक्यात मारून निर्घृणपणे खून केला. 

दशांत अनिल परदेशी वय १७, रा. तळेगाव दाभाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कमलेश सुरेश परदेशी वय २० आणि प्रकाश संजय लोहार वय १९ दोघेही रा. नालबंद गल्ली, तळेगाव दाभाडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश हा मयत दशांतचा चुलत भाऊ आहे.

मयत दशांत हा बुधवारी रात्री घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले असता दशांतचा मृतदेह नॅशनल हेवी कंपनीजवळ आढळला. मृतदेह आढळलेले ठिकाण पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दशांतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात दशांतवर गोळी झाडली नसल्याचे तसेच एखाद्या कठीण वस्तूने मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.


दशांतवर कुणी आणि का हल्ला केला याबाबत तळेगाव पोलिसांनी तपास सुरू केला. हा घटनेचा तपास करत असताना घटनास्थळ आणि इतर ठिकाणी पोलिसांनी भेट दिली. पोलीस ज्या ठिकाणी जातील तिथे त्यांना एक चेहरा कॉमन दिसत असे. प्रकाश लोहार हा पोलीस जातील तिथे जात असे.


पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी प्रकाशला हटकले आणि त्याची विचारपूस केली. त्यात तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या एका साथीदारासोबत मिळून केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कमलेश याला देखील अटक केली.

दशांतने कमलेश आणि प्रकाश या दोघांना काही महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. त्यांनतर, दशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ३०२ शंभर टक्के अन पिस्तूलाची इमोजी’ असे स्टेटस ठेवले. हे स्टेटस फक्त कमलेश आणि प्रकाश या दोघांना दिसेल अशी फोनमध्ये सेटिंग केली. दशांत आपल्याला मारणार अशी भीती त्या दोघांना होती. त्यामुळे कट करून दोघांनी दशांतला फोटो काढण्याच्या बहाण्याने नॅशनल हेवी कंपनीजवळ बोलावले. फोटो काढत असताना अचानक त्याच्यावर हातोडीने हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 मावळ प्रतिनिधी पठाण एम एस 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post