मिर्झा गालिब म्हणजे गझलेचे बादशहा.

 मिर्झा गालिब म्हणजे गझलेचे बादशहा. सोमवारता. २७ डिसेंबर २०२१रोजी मिर्झा गालिब यांचे दोनशे पंचवीसावे जन्म वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने या महान शायराबद्दल...


मिर्झा गालिब यांची 'गालिबियत '

------------------------

प्रसाद  माधव कुलकर्णी, इचलकरंजी

  ( ९८ ५०८ ३० २९०)

  

हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले

 बहोत निकलें मेरे अरमाँ लेकीन फिर भी कम निकले...

नींद उसकी है, दिमाग उसका है,राते उसकी है 

तेरी जुल्फे जिसकी बाजूपर परेशा हो गयी..

ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता 

अगर और जीते रहते यही इंतजार होता..

मौत का एक दिन मुअय्यंन है

निंद क्यो रातभर नही आती..

मरते है आरजु मे मरनेकीं

मौत आती है पर नही आती..

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है 

आखिर इस दर्द की दवा क्या है..

गुजर रहा हूँ यहाँ से भी गुजर है जाऊनगा

मै वक्त हु,कही ठहरा तो मर जाऊनगा..

 हम वहा है जहा से हमको भी 

 कुछ हमारी खबर नही आती..



यासारखे शेकडो अप्रतिम शेर लिहिणारे मिर्झा गालिब म्हणजे गझलेचे बादशहा. शुक्रवार ता. २७ डिसेंबर २०२१रोजी मिर्झा गालिब यांचे दोनशे पंचवीसावे जन्म वर्ष सुरू होत आहे. 

है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे 

कहते है की गालिब का अंदाजे बयां और !

" या जगात गझला लिहीणारे अनेक जण आहेत पण असं म्हणतात की गालिबची विचार करण्याची आणि तो शब्दबद्ध पद्धत काही औरच आहे ."असे म्हणणाऱ्या गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे झाला. मिर्झा गालिब हे स्वतः तत्वज्ञानी नव्हते. पण आपल्या अनेक गझलांतून त्यांनी जीवनाबद्दलचा गंभीर दृष्टिकोन, एक तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उर्दू बरोबरच फारसी भाषेतून हे लिखाण केले. वयाच्या अकराव्या वर्षापासून फारसी मधून लिहिणारे गालिब यांनी मित्रांच्या आग्रहाखातर उर्दूतून लेखन केले. गालिब यांच्या लेखनावर अमिर खुसरो आणि मीर यांचा काही प्रमाणात प्रभाव दिसतो. अर्थात गालिब यांच्या एकूण लेखनात ' गालिबियत ' आहे.गालिब याचा अर्थच प्रभावी हा आहे. 

गालिब यांचे आजोबा तुर्कस्तानातून भारतात आले होते. गालिब यांचे वडील अब्दुल्ला बेग लखनऊ, हैदराबाद, अल्वार येथे संस्थानात काम करत होते. एका लढाईत मारले गेले. त्यावेळी गालिब फक्त पाच वर्षांचे होते.त्यानंतर गालिब यांना त्यांचे काका नसरुल्ला बेग यांनी सांभाळले. पण गालिब नऊ वर्षाचे असताना हे काकाही हत्तीवरून पडून वारले.त्यामुळे गालिब आपल्या आईचे वडील ख्वाजा गुलाम हुसेन कमीनदान यांच्याकडे  आग्र्याला राहू लागले.

आपल्या गझलेतून उर्दू गझलेला एक अत्यंत उंची प्राप्त करून देणारे गालिब हे मीर तकी मीर यांना मानत होते. आग्रा येथे १७२४ साली जन्मलेले मीर तकी मीर उर्दू शायरीचा सरताज म्हणून ओळखले जातात. मीर तकी मीर यांचे सहा दिवान प्रकाशित झाले.दिवान म्हणजे केवळ गझलसंग्रह नाही.तर वर्णमाणेत जेवढी मुळाक्षरे असतात त्या प्रत्येक अक्षराचे यमक घेऊन किमान एक गझल लिहायची.अशा सर्व मुळाक्षरांच्या गझला एकत्र असलेला संग्रह म्हणजे 'दिवान '. असे सहा दिवान लिहिणाऱ्या मीर यांची लेखन ताकद काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. मीर तकी मीर यांनी  जवळजवळ चौदा हजार शेर असलेल्या अठराशेहून अधिक गझला लिहिल्या. त्याशिवाय कसिदे म्हणजे स्तुतीपर कविता, मसनवी म्हणजे खंडकाव्ये ,रुबाया यासहित भरपूर लेखन केलर.' जीक्रे मीर ' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.गालिब लहान बारा वर्षाचे असताना मीर कालवश झाले.त्यामुळे गझलकार म्हणून त्यांचा परिचय असणे शक्य नाही.पण मिरच्या लेखनाची भव्यता गालिब यांना नंतर दिसून आली.म्हणून तर आपल्या लेखनाच्या 'अंदाजे बयां 'बद्दल अभिमान असणाऱ्या गालिब यांनीच एका शेरात म्हटलं आहे ,अरे गालिब,गझलेचा तूच कोणी खास बापमाणुस आहेस अस नाही,मागच्या पिढ्यांत कोणी मीरही होऊन गेलाय '

 ' रेखते के तुम ही उस्ताद नही हो गालिब

 कहते है अगले जमाने मे कोई मीर भी था !

 दोनशे वर्षांपूर्वी गालिब यांनी लिहिलेल्या रचना आजही अक्षर वाङ्मय म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे शेकडो शेर रसिकांना तोंडपाठ असतात. खऱ्या कवीची अथवा शायरांची याहून दुसरी ओळख काय असू शकते? गालिब यांचे संगोपन करताना त्यांच्या आजोबांनी शिक्षणाकडे चांगले लक्ष दिले.मौलवी मुअज्जम आणि मुल्ला अब्दूसमद या त्यांना शिकवणाऱ्या पंडितांकडून गालिबनी फारसी भाषा, इस्लामपूर्व संस्कृती,इस्लाम धर्म, सुफी साहित्य यांचा सखोल अभ्यास केला.गालिब बालपणापासूनच काहीसे हूड स्वभावाचे होते.स्वतंत्र विचारांचे व स्वतंत्र बाण्याचे होते. सुधारक वृत्तीचे होते. म्हणून तर त्यांची गझल केवळ रिवायती नव्हे तर तरक्कीपसंत दिसते.गालिब यांचा कर्मकांडावर अजिबात विश्वास नव्हता.नमाज ,रोजा वगैरे केलेच पाहिजे असे ते मानत नसत.सर्व धर्मातील सारं तत्त्वावर त्यांची श्रद्धा होती  म्हणूनच त्यांच्या रचनेत मानवधर्म त्यांनी महत्त्वाचा मानलेला स्पष्ट दिसते.गालिब तेरा वर्षाचे असतांना त्यांचा विवाह दिल्लीचे एक नबाब इलाही बक्ष यांची मुलगी उमराव बेगम हिच्याशी झाला.गालिब हे उंच,धिप्पाड,देखणे व्यक्तिमत्त्व होते.

गालिब यांची ईश्वरावर श्रद्धा होती. पण ते कर्मठ नव्हते. परंपरागत धर्म-रूढी यापेक्षा वेगळा विचार करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. ती त्यांच्या अभ्यासातून आणि समाजाकडे डोळसपणे पाहण्यातून आलेली होती. गालिब व्यक्तिगत जीवनात अतिशय असमाधानी आणि काही अर्थाने दुर्दैवी होते. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक आघात सहन करावे लागले.त्यांच्या चुलत भावांनी त्यांची मालमत्तेच्या वाटणीत फसवणूक केली.कज्जे विरोधात गेले.वंशपरंपरागत तनख्याच्या बाबतीतही चुलत भावांनी फसविले. त्यांची मुले एकापाठोपाठ एक दगावली. त्यांचा धाकटा भाऊ वेडा झाला. गालिब यांनी  मुलगा मानलेल्या ' आरिफ 'या पुतण्याचाही मृत्यू त्यांना पाहावा लागला. जिवलग मित्र शायर मोमीन यांचा मृत्यू त्यांनी पाहिला.लौकिकार्थाने गालिब यांनी उपजीविकेसाठी कुठे स्थिर नोकरी गेली नाही. ते नेहमीच मित्रांच्या सहकार्यावर, चाहत्यांच्या देणग्यांवर ,उमरावांच्या मदतीवर गुजराण करत राहिले. 

ते त्या काळच्या दरबारात दरबारी कवी म्हणूनही जात नसत.कारण ते म्हणत मी गेल्यानंतरही माझ्या गझला रसिकांच्यात शेकडो वर्षे राहणार आहेत. गझलेच्या  रूपाने मी अजरामर राहणार आहे. त्यामुळे इथे दरबारात येऊनच मला लौकिक प्राप्त होईल असे मी मानत नाही.गालिब यांचे त्याकाळीही प्रचंड चाहते होते.बऱ्यापैकी थाटात जगण्याची सवय असलेल्या गालिब यांना त्याकाळी पन्नास हजाराची कर्ज होते.आणि ते सर्व त्यांनी फ़ेडत आणले होते.त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते हजारभर रुपयांच्या कर्जाची धनी होते. ते नंतर त्यांच्या भावांनी फेडले.गालिबना जन्मभर कटू अनुभव आणि कठोर टीकेला सामोरे जावे लागले.पण त्यांनी कधीच कोणाला वेडेवाकडे उत्तर दिले नाही.ते म्हणायचे ,'अरे शत्रू वाईट बोलले तर वाईट कशाला वाटून घ्यायचं.सगळेजण ज्याला चांगला म्हणतात असा जगात माणूस तरी आहे का ?'

" गालिब बुरा ना मानिये जो दुश्मन बुरा कहे

 ऐसा भी है कोई के सब अच्छा जिसे कहे !

गालिब आपल्या स्वतःच्या कामासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयात कलकत्त्याला निघाले होते. पण वाटेत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लढाया व अन्य अडचणीमुळे त्यांना तीन महिने बनारसला मुक्काम करावा लागला.तेथे ते बनारसच्या विद्वान ब्राम्हणांसमवेत चर्चेत रमले. याच कालावधीत गालिब यांनी खंडकाव्य लिहिले.' भारत हेच एक पवित्र मंदिर आणि बनारस हा त्या मंदिरात तेवत असलेला नंदादीप आहे '.असे त्यात त्यांनी म्हटले आहे. या खण्डकाव्यातून गालिब यांची परधर्म सहिष्णुता आणि सर्व धर्म समभावी विचारपद्धती दिसून येते.तसेच गालिब इंग्रजी राजवटीने आलेल्या तारायंत्रे,रेल्वे आदी नव्या सुधारणा जाणून  घेऊन त्याआधारे समाज सुधारणा केली पाहिजे असे मत मांडत होते.


नामवंत शायर व गझलेचे अभ्यासक प्रा.डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी म्हटले आहे की, गालिब ध्येयमंदिरापेक्षा ध्येय मार्गाचाच चाहता वाटतो.म्हणूनच की काय,त्याने  तृप्तीपेक्षा तृष्णेची प्रशंसा केलेली आढळते.हा त्याच्या काव्याचा विशेष पैलू म्हणता येईल.त्याच्या बर्‍याचशा रचना फारसी भाषेत आहेत. त्या अतिशय सुंदर असून देखील उपेक्षित राहिल्या. कारण त्याच्या वेळी फारसीचे जाणकार फारसे राहिलेले नव्हते.आणि खुद्द इराणमध्ये त्याची 'भारतीय पंडित ' म्हणून उपेक्षा होत होती. पण गालिबला स्वतःला मात्र आपल्या फारसी रचनांचा अभिमान वाटत होता... गालिबच्या सुरुवातीच्या उर्दु रचनादेखील फारसी शब्दानी युक्त असल्यामुळे दुर्बोध वाटत असत. त्यामुळे त्याच्यावर टीका होत असे आणि त्या नेमक्या रसीकांपर्यंत पोहोचतही नसत. त्यामुळे गालिब नाराज होऊन तीन - चार महिने मुशायर्‍यात आलाच नाही. पण त्याचे मित्र मोमिन ,मौलवी फजले हक  खैराबादी ,सासरे नबाब इलाहीबक्ष यांनी गालिबला समजावले. आणि रसिकांपर्यंत शेरशायरी पोचणार नसेल तर या लेखनाचा उपयोग काय ?असा सवाल केला. यावर गालीबने विचार केला आणि आणि आपल्या जवळजवळ अठरा हजार शेरांपैकी बाराशे शेरांचे सोप्या उर्दूमध्ये पुनर्लेखन केले.या केवळ बाराशे शेरांमुळेच गालिबला दिगंत कीर्ती लाभली. त्याचे बरेचसे उत्तम लिखाण,सोळा हजार आठशे शेर फारसीप्रचुर भाषेत असल्याने  जनसामान्यांपासून अद्यापही दूरच आहेत.'

 

 त्या  कालावधीत मोगल साम्राज्य मोडकळीला आला होतं. दिल्लीत शायरीला बहर आला होता. खुद्द बादशहा बहादूरशहा जफर मोठे शायर होते. गालिबपूर्वकाळातील उर्दू शायरी ही पारंपारिक शृंगारीक शायरी होती.ती फारसीचे  अनुकरण करत होती.पण गालिब यांच्या अलौकिक प्रतिभेने आणि कल्पनाविलासाने उर्दू गझलेचा चेहरामोहरा आणि संपूर्ण बाज बदलला.त्या शायरीची उंची वाढली. अठराशे सत्तावनच्या  स्वातंत्र्यसमरानंतर जे अनेक बदल झाले त्यातून गालिबच्या जीवनाची ही घडी थोडी अधिक विस्कटली. शेवटची दोन - अडीच वर्षे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांना अधूनमधून विस्मरणही होत होते. असे हे महान गझलकर दिल्लीतच  १५ फेब्रुवारी १८६९ रोजी कालवश झाले. एका शेरात ते म्हणाले होते,

' कैदे हयात व बंदे-गम अस्लमे दोनों एक है 

मौतसे पहले आदमी गमसे नजात पाए क्या !

 म्हणजे आयुष्य म्हणजे  उमरकैद अर्थात जन्मठेप आणि दुःख या दोन्ही गोष्टी सर्वसाधारणपणे एकच आहे.जीवन हेच दुःख आणि दुःख हेच जीवन. मृत्यूपूर्वी माणसाला दुःख मुक्ती शक्य कशी आहे ?'

 जिंदगी अपनी जब इस शकल की गुजरी गालिब

  हम भी क्या याद करेंगे के खुदा रखते थे..

   म्हणजे , गलीबच जीवन अशा पद्धतीने गेले की आपल्यावर परमेश्वराची छत्रछायाब होती किंवा असते तरी कसे म्हणावे ?जीवनाला दुःख मानणाऱ्या गालिब यांनी उर्दू गझलविधेत मात्र आपल्या कसदार लेखणीने अजरामर आनंद पेरला. गालिब यांच्या२२४ व्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन..

( लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.तसेच कवी आहेत. गेली पस्तीस वर्षे गझल हा काव्यप्रकार लिहीत आहेत.गझलांकित ( २००४ ),गझलसाद ( २०१० ), गझल प्रेमऋतूची ( २०२१ गझलनंदा यांच्यासह ) हे गझलसंग्रह व गझलानंद (२०१४ ) हे काही उर्दू -हिंदी गझलकार व त्यांच्या गझलांची ओळख करून देणारे पुस्तक प्रकाशित आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post