मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्मवर्ष प्रारंभ दिनी अर्थात सोमवार ता. २७ डिसेंबर २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रकाशित झाला.

 गझल प्रेमऋतूची' हा ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी आणि गझलनंदा उर्फ प्रा.सुनंदा पाटील यांचा गझलसंग्रह मिर्झा गालिब यांच्या  २२५ व्या जन्मवर्ष प्रारंभ दिनी अर्थात सोमवार ता. २७ डिसेंबर २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रकाशित झाला. मराठी गझलविधेत अनेक वैशिष्ट्यानी युक्त असलेल्या या गझल संग्रहाची प्रस्तावना त्याचे अंतरंग उकलून दाखवते......


*प्रेमऋतुच्या पखरणीपूर्वी*

 ------------------

*" गझल प्रेमऋतुची "* हा गझल संग्रह मराठी गझल विश्वात सादर करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. तसेच हा अनेकार्थांनी एक वेगळा प्रयोगही आहे. एकविसाव्या शतकातील २०२० व २१ ही गेली दोन वर्षे विश्वातील बहुतेक मानवजात कोव्हिड - १९ च्या  भयावह संकटातून जात आहे. आजही ते भय पूर्णतः संपलेले नाही. या वैश्विक रोगराईचा फटका आपल्या भारताला व त्यातल्या आपल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. या साऱ्यात अपरिमित मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. ती भरून येण्याला फार काळ जावा लागेल. पण त्याच बरोबर मानवी मनाची विदीर्णता जास्त झालेली दिसते. मानवी मनाचा तलमपणा जीर्ण होत जाणे हे अतिशय वेदनादायी असते. ते जीर्णपण प्रेमाच्या टाक्यांनी भरून काढणे महत्वाचे असते. शस्त्र न वापरता केली जाणारी एकमेव व खात्रीशीर इलाज करणारी शस्त्रक्रिया केवळ प्रेमाचीच असू शकते. प्रेमाची प्रस्थापना हा दुःखमुक्तीचा प्रभावी मार्ग आहे.

कोणतेही दुःख आपुलकीच्या स्पर्शातून निवारू शकते हा मानवी जीवन व्यवहाराचा अनुभवसिद्ध अलिखित नियम आहे. अशावेळी झालेल्या आजाराने अथवा आजार होऊ नये यासाठी आपल्याच माणसांपासून विलगीकरणात राहावे लागणे, हे ठोके जिवंत असलेल्यांसाठी जीवघेणे ठरू शकते. कोरोनात रोगापेक्षा माणसे भीतीने दगावली असा एक निष्कर्ष काढला गेला. तो बरोबरही आहे. पण त्याचबरोबर आपली माणसे आपल्यापासून दुरावली गेली ही वेदना तीव्र असते. आजारपणात शारीरिक सबलतेसाठी औषधे आवश्यक असतात. तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी जिव्हाळ्याचा स्पर्शही गरजेचा असतो . तो स्पर्श न मिळाल्यामुळेही माणसे दगावली आहेत हे वास्तव साहित्यिक म्हणून आम्हाला जास्त टोचत राहील . तसेच आजचे समस्त वर्तमानही अन्य विविध कारणांनी राग, द्वेष , मत्सर यांनी भरून गेलं आहे. त्याचं रूपांतर अस्वस्थ वर्तमानात झालं आहे. त्याच्या कारणमीमांसेची आणि उपाययोजनांची वेगळी चर्चा ललित आणि वैचारिक लिखाणातून आम्ही आजवर नेहमीच केली आहे. करत असतोही. पण कवितेतील आमची आवडती विधा म्हणजे गझल. म्हणून या गझल संग्रह्याच्या  माध्यमातून  प्रेमभावनेचा शिडकावा, प्रेमभाव प्रस्थापना करण्याचा आणि त्या  विचारविश्वात रसिक वाचकाला, आस्वादकाला नेण्याचा  हा प्रयत्न आहे. *" गझल प्रेमऋतुची "* हा गझलसंग्रह त्या दिशेने जाणीवपूर्वक टाकलेले एक पाऊल आहे. 

कोरोना काळातच गझलनंदा यांचा *'सावली अंबराची '* हा गझल संग्रह (इ बुक) प्रकाशित झाला. याच काळात प्रसाद कुलकर्णी यांचा *'एक रविवार : एक गझल '* हा यु ट्यूब चॅनेलवरील उपक्रम सुरू झाला. या दोन्ही बाबतची एकमेकांशी चर्चा करतांना *'गझल प्रेमऋतुची '* ही संकल्पना पुढे आली, आणि ती आता मूर्त रुपात साकारते आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.

याशिवायही या संग्रह निर्मिती मागील काही वैशिष्ट्ये आहेत. एकदा हा संग्रह करायचे निश्चित झाल्यानंतर त्यादृष्टीने आपणच लिहिलेल्या प्रेमावरील गझला पुन्हा शोधून काढल्या. काही पूर्वप्रकाशित संग्रहात तर काही वहीत मिळाल्या. या शोधात एक बाब आश्‍चर्यकारकरीत्या जाणवली. ती म्हणजे आम्हा दोघांच्याही लेखनात सामाजिकता प्रचंड प्रमाणात ठळकपणे दिसत असूनही प्रेमावरील गझलाही मोठ्या संख्येने लिहिलेल्या दिसून आल्या. त्यामुळे आम्ही पहिला निर्णय घेतला की दोघांच्या प्रेम विषयावरील पन्नास - पन्नास गझला निवडूया. त्यानुसार या गझलांची  निवड  केली. अर्थात संग्रहासाठी  शंभर गझलांचीच संख्या निश्चित केल्याने इतर अनेक प्रेम गझला येथे घेऊ शकलो नाही. निवड करण्याचे काम मोठे प्रेममयी असले तरी तेवढेच अवघडही होते यात शंका नाही. पण अखेर ज्या निवडल्या त्या आपणासमोर या संग्रह रूपाने ठेवत आहोत. 

प्रेम हा केवळ रोग नाही तर तो त्याहून अधिक योग आहे हे खरेच. स्वामी विवेकानंद यांचे 'प्रेमयोग ' नावाचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी म्हटलंय *,' पुस्तकी वाचनाने आपण पोपट बनतो, ग्रंथवाचनाने कोणीही खरा विद्वान होऊ शकत नाही. पण प्रेमाचा एखादा देखील शब्द कुणी शिकेल तो खरा विद्वान ....* प्रेमाचे पहिले लक्षण असे आहे की, प्रेम व्यवहार करणे जाणत नाही. जोपर्यंत एखादा मनुष्य दुसऱ्याकडून काही मिळवण्यासाठी त्याच्यावर प्रेम करताना दिसतो तो पर्यंत ते प्रेम खरे नव्हे असे समजा. ती दुकानदारी आहे . जिथे खरेदी-विक्रीची वृत्ती असते तिथे प्रेम नसते.' याचाच अर्थ प्रेमयोग ही फार उदात्त अनुभूती आहे. विचार आहे, आणि तो अतिशय गरजेचाही आहे.

कवितेत शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र ,भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत असे नऊ रस आहेत. तर प्रसाद, माधुर्य, ओज हे काव्यगुण असतात. काव्याचा आवाका फार मोठा आहे. प्रेमभावना शृंगाररसाचा एक लहानसा भाग म्हणतात येईल . गझलेचा विचार केला तर काही ठिकाणी गझल या शब्दाचा अर्थच प्रेमालाप असा घेतला गेला आहे. *गझल प्रेमऋतुची* मध्ये त्याचे दर्शन होते.


 *सजीव जे जे त्याच्यामध्ये प्रेमाचाही ऋतू असावा* 

 *गुलाबातल्या काट्यामध्ये प्रेमाचाही ऋतू असावा..*

 

 *भेटलास तू अन श्वासाला सूर गवसला* 

 *नशा गुलाबी प्रेमऋतूची मला चढावी...*


*आज प्रिये तू सोबतीस ये कोसळती या वर्षांधारा*

*आठवणीने तुझिया फुलतो हा गात्रांचा मोरपिसारा..*


*तुला वाटते मोगरा माळते मी*

*तुझा श्वास घेऊन गंधाळते मी..*


*प्रेमरसाळी अभंग म्हणतो हे गझलेला*

*तुझ्या एकदा मुशायऱ्याला यावे म्हणतो...*


*बघ राधेची वेणी सुटली भान हरपले*

*श्रीकृष्णाच्या बासरीत मग सूर उमटले...*


*ओठ तुझे हे दोन्ही मिसरे..चुंबन मतला*

*तिथेच होत्या गुणगुणल्या मी माझ्या गझला..*


*जन्मोजन्मी ओठ असू दे ओठी राणी*

*ओठांनी मी पुन्हा गायची अनवट गाणी...*


अशा विविध प्रकारच्या भावना या गझलांमधून व्यक्त होताना दिसतात.

आम्ही दोघे गेल्या पस्तीस वर्षापासूनचे सुहृद आहोत. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट उर्फ दादा यांच्याकडे १९८५ साली आम्ही भेटलो. ( गझलनंदा तर नागपुरात असल्याने १९७९ पासूनच दादांच्या संपर्कात होत्या.) आम्ही दोघांनीही  दादांच्याकडून गझलेची मुळाक्षरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो आजही सुरूच आहे. तसेच जे कळले , समजले ते नव्या पिढीकडे देण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. तसेच दोन गझलकारांचा मिळून एक गझल संग्रह येणे हे या निमित्ताने  बहुतेक मराठीत प्रथमच घडत आहेत. अनेकांच्या गझला असलेले प्रातिनिधिक गझलसंग्रह अनेक आले आहेत. पण गेली तीन - चार दशके सातत्याने गझल लिहिणाऱ्या दोन गझलकारांचा एकत्र संग्रह हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.  ज्याला 'मुसलसल गझल ' म्हणतात तसा म्हणजे एकाच विषयावरील गझलांचा हा संग्रह आहे. असाही संग्रह बहुतेक प्रथमत येतो आहे. मुसलसल याचे वारंवार, क्रमबद्ध,  एकाच साखळीतील, एकाच विषयातील, सलगता असलेला, शृंखलाबद्ध, निरंतर असे अनेक अर्थ आहेत. अशा पद्धतीचे  शेर असलेली गझल ती मुसलसल गझल. गझलेची सर्व बंधने त्यात पाळलेली असल्याने ती गझलच असते , कविता नव्हे. विषय एकच असला तरी की प्रत्येक शेर स्वतंत्र कविता असतो. त्यामुळे मुसलसल मध्येही किमान पाच कविता एकत्र दिसतातच. शिवाय विषय एकच असला तरी त्याच्या छटा वेगवेगळ्या असतातच. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या दोन टोकांना म्हणजे विदर्भ आणि दक्षिण  महाराष्ट्र  येथे राहणारे दोन गझलकार यानिमित्ताने संग्रह रुपाने एकत्र येत आहेत. तसेच यातील एक गझलकार आहे आणि एक गझलकारा आहे. या बरोबरच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे *गझलेचे तंत्र ,व्याकरण काय व कसे असते याची अनेक बारकाव्यांची तंत्रशुद्ध  माहिती " मराठी गझल : स्वयंअध्ययनाची अंकलिपी "* या  स्वतंत्र लेखाद्वारे या संग्रहात दिलेली आहे. गझलनंदा यांनी लिहिलेला हा लेख गझल लिहिणाऱ्या व लिहू पाहणाऱ्या सर्वानाच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही.  दादांच्या गझलेच्या बाराखडी नंतर असा प्रयोग हेही या गझल संग्रहाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ‌ ख्यातनाम उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभदिनी ' गझल प्रेमऋतुची ' हा संग्रह येत आहे याचाही मोठा आनंद आहे. अशी अनेक वैशिष्टये घेऊन हा गझल संग्रह येत आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे.

*निंद उसकी है ,दिमाग उसका है,राते उसकी है*

*तेरी जुल्फे जिसकी बाजूपर परेशां हो गयी ……*

अर्थात त्याचीच झोप मधुर असेल, रात्र तृप्तीची असेल आणि मोठा दिमाख असेल की, ज्याच्या बाहुंवर तू निश्चिन्त पणे, प्रेमभराने निद्रिस्त झालेली असशील आणि तुझा अस्ताव्यस्त केशसंभार त्याच्या बाहुंवर पसरलेला असावा.. असा गालिब यांचा एक प्रेमऋतुचा शेर आहे. त्यांच्या जन्मदिनी हा संग्रह येत असतांना हा शेर आवर्जून आठवला. आणि इथे नोंदवावा वाटला.

खरतर प्रेम हा केवळ अडीच अक्षरांचा शब्द .पण सर्वाधिक प्रबळ , तेजस्वी अशी ही भावना जोपासणारा . प्रेमभावना जगात अस्तित्वात आहे म्हणूनच जगरहाटी सुरू आहे. प्रेमाची नेमकी व्याख्या करणं कुणाला जमलं नाही आणि जमेलसं  वाटतही नाही. प्रेम या शब्दाचेच अनेक विभ्रम आपल्याला बघायला मिळतात . मातृप्रेम , पितृप्रेम , अपत्य प्रेम , भाऊ बहीण यांच्यातलं प्रेम , मित्र मैत्रीणी , पतीपत्नी मधील प्रेम , अणि प्रियकर प्रेयसी यांच्यातलं प्रेम . या सर्वांच्या भावच्छटा आणि नात्यांचे पदर  वेगवेगळे आहेत.

 प्रेमालाच कुणी सख्य म्हणतात . ज्या दोघांमधे सख्य असेल ते सखी किंवा सखा . कुणी मैत्र म्हणतं . मैत्र असताना होते ती मैत्री . पण प्रेम , मैत्र आणि सख्य यातही एक सूक्ष्मशी विभाजक रेषा आहे . एक स्त्री आणि एक पुरूष , यांच्यात निर्माण झालेली प्रेमभावना . ते प्रेम असतं . कुठलीही पूर्वसूचना न देता प्रेम आयुष्यात येतं . ज्यावेळी आजूबाजूला 'कुजबुज' सुरू होते, तेव्हा काही तरी भानगड असावी, हा आशय असतो, तर जेव्हा आजुबाजूला 'गुजगुज' सुरू होते , तिथे प्रेमाचा शिरकाव झालेला असतो. स्त्री पुरुषाच्या केवळ शारीर आकर्षणाला प्रेम समजलं जातं तिथे या पवित्र भावनेचा अपमान होतो. प्रेम म्हणजे परस्परांच्या भावना जपणं , स्वतःला झोकून देणं . त्याग ही गोष्ट प्रेमाच्या मुळाशी असावी लागते. मग ओघाने आलेलं शारीर आकर्षण हा एक सर्वमान्य भाग ठरतो .

प्रेम म्हणजे मोहिनी, प्रेरणा , शीतल चांदणं , हिवाळ्यातली ऊब आणि उन्हाळ्यातली पर्जन्यधारा , रात्रीत गवसणारी किरणशलाका , दिवसा हवंसं सुखद चांदणं . अलवार अशी वाऱ्याची झुळूक जी वारंवार अनुभवाविशी वाटते . झाड सुकलेलं वाटत असतानाच वसंत ऋतूच्या आगमनाने पालवी फुटणं म्हणजे प्रेम . कळीचं हळुवार उमलणं म्हणजे प्रेम.

प्रेम म्हणजे हुरहूर, असोशी, आपलेपण , जिव्हाळा, गोडवा , केवळ नजरा नजर म्हणजे प्रेम. आवाज ऐकण्याची ओढ म्हणजे प्रेम आणि स्पर्शाची शीतलता म्हणजे प्रेम. ओठावर थरथरलेली गझल म्हणजे प्रेम . कानाशी वाजलेलं अलगूज म्हणजे प्रेम . अंगावर उठणारा शहारा म्हणजे प्रेम . प्रेम म्हणजे एकरूप होणं . जिथे तू आणि मी या भावना निखळून पडलेल्या असतात. शब्द असतो " आम्ही. *" मी कडून आम्ही कडे होणारा प्रवास प्रेमाखेरीज होऊच शकत नाही.*

 *'क्षण एक पुरे प्रेमाचा ,वर्षाव पडो मरणांचा '* म्हणणारे गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी हे मानवी जीवनातील सार्वकालिक भावनिक सत्य मांडून जातात. झाडाची मुळे आसुसलेपणाने पाण्याचा दिशेने जात असतात. याच पद्धतीने मानवी मन हे प्रेमाच्या ओलाव्याच्या  दिशेने धावत असते. खरा आनंद मनातच वास करत असतो.  ते मन आनंदाची मिसळण आणि घुसळण करण्यासाठी उत्सुक असते. प्रेमप्रकाशाचा उगम मनातच सर्वप्रथम होत असतो. 

प्रेमधर्म हाच खरा धर्म आहे. ओशोंनी एका पत्रामध्ये म्हटलं होतं, *' आपल्या प्रत्येक श्वासात सर्वांबद्दल असलेल्या प्रेमभावनेमुळेच आपल्यात संगीताची निर्मिती होते. स्वतःतील संगीत नष्ट करणे म्हणजे अधर्म आहे ,पाप आहे.या उलट स्वतःला संगीतमय  बनविणे हाच एकमेव धर्म आहे. प्रेम संगीत आहे.प्रेम सौंदर्य आहे. आणि म्हणूनच प्रेम म्हणजे धर्म आहे.'

परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जागतिक प्रेमावर आपल्या लेखणीची मोहरच उठवली आहे. गुरुजी म्हणतात ,

*खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे ॥*

मानवी जीवनात प्रेमाला फार मोठे महत्त्व आहे. प्रेमाशिवाय माणूस शून्य आहे . अर्चिबाल्ड मॅकलेच हा एक श्रद्धाळू कवी होता. त्याची सर्वच मते सर्वाना पटतील अशी नाहीत. पण त्याने एके ठिकाणी म्हटलं होत,' माणूस हा सर्व गोष्टींसाठी देवावर अवलंबून असतो. देव मात्र एकाच गोष्टीसाठी माणसावर अवलंबून असतो. ते म्हणजे प्रेम. माणसाचं प्रेम नसेल तर देव हा देव राहणार नाही. तो नुसताच निर्माता बनेल. आणि प्रेमभावनेवर कोणाचाही अगदी साक्षात देवाचा सुद्धा ताबा असू शकत नाही. ते आपोआप भेट म्हणून मिळतं किंवा अजिबात मिळत नाही. ' हे सारं पाहिलं आणि मानवी मन नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रेमाची इयत्ता आणि महत्ता समजू शकते. 

स-हित नेतं ते साहित्य अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते.आजच्या अस्वस्थ वर्तमानात समाजाला स-हित नेण्याचा प्रयत्न म्हणून या गझल संग्रहाकडे आम्ही पाहतो.

*गझल प्रेमऋतुची मधून प्रेमभावनेच्या विविध रंगांची उधळण होताना दिसते.*


*छत्रीत एक माझ्या ही ऊब खास होती*

*थंडीत पावसाच्या तू उष्ण श्वास व्हावे...*


*तिच्या न माझ्या जुळली आहे तार मनाची*

*गझल म्हणोनी असते ओठी फक्त प्रियाची..*


*मी श्वासाचा धमार लिहिला ओठावरच्या लाली संगे*

*तरंग उठले मग प्राचीवर दहा दिशांनी धुक्याप्रमाणे..*


*गझलेचा प्रियकर होणे हे साधे सोपे नसते*

*एकेका शेरासाठी मी रक्त अटवले होते...*


*प्रेमासाठी हवा कशाला गुलाब हाती*

*नवी गझल मी लिहून करते तुमच्या नावे..*


*तुझे ओठ ओठी...किती मस्त मतला*

*करू दे पुरी तू गझल माझी मला...*


*बोलका होऊन जातो शेर माझा*

*ही भटांची नाळ आहे ओळखावे......*


*कुबेर म्हणतो ज्याला त्याला*

*ह्याच्या गझला म्हणजे वैभव..*.


मराठी गझल विधेने प्रेमभावना मोठ्या ताकदीने मांडली आहे. दादांनी गझलेचा मूळ आशिकांना अंदाज आपल्या अनेक गझलांतून पेश केला. त्यामुळे गझलेचे तंत्र जसे दादांनी दिले तसे प्रेम गझलेचा मंत्रही त्यांनीच दिला . 'रिवायती गझल ' अथवा 'पारंपरिक गझल ' म्हणतात ती गझल आणि ' तरक्कीपसंद गझल ' अथवा ' सुधारणावादी गझल 'म्हणतात ती गझल एकाच वेळी मराठी गझल विश्वात आणण्याची फार मोठी कामगिरी दादांनी केली आहे. दादांमुळे मराठी गझलविश्व प्रारंभीच आशयसमृद्ध झाले. अन्य भाषांच्या गझलेच्या तुलनेत दादांनी केलेली ही कामगिरी विजा घेऊन येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी मोठी उपकारक ठरली आहे.यात कोणाला शंका असू नये.


साठोत्तरी मराठी कवितेमध्ये आधुनिक मराठी कविता म्हणून अनेक कवितासंग्रह आले. अनेक मान्यवरांनी ते संपादित केले. पण या निवडलेल्या कवितांमध्ये प्रेम कवितांचे प्रमाण फारच कमी आहे हे स्पष्टपणे दिसते. मराठी कवितेने , गझलेने मानवी जीवन व्यवहारातील सर्व विषय समर्थपणे हाताळले आहेत. मात्र त्याच वेळी जगातून प्रेम भावना कमी होत असताना त्याची कविता पुढे जाणीवपूर्वक पुढे आणणे  आवश्यक आहे अशी आमची धारणा आहे. कृत्रिम रंगापेक्षा जिव्हाळ्याचे रंग अधिक पक्के असतात. जिव्हाळा हाही एक ऋतु आहे. त्याचेच नाव प्रेमऋतु आहे असे आम्ही मानतो. माणूस हा नाशवंत आहे. त्यामुळेच त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. प्रेमभावना त्याला पूर्णत्वाकडे नेऊ शकते. *' प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश आहे '* असं कुसुमाग्रजांनी म्हटलं होत. त्याच  व्यापक भूमिकेतून गझल प्रेमाकडे आणि प्रेमऋतू कडे बघते. रवींद्रनाथ टागोर यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं , *" दुसऱ्या ओळीशी यमक जुळल्याशिवाय पहिल्या ओळीला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटत नाही. आणि पहिली ओळ तयार होणे हे देखील सर्वस्वी आपल्या हातात नसते."* खरं तर  रवींद्रनाथांचे हे वाक्य एका अर्थाने गझलेची निर्मितीप्रक्रियाच सांगते आहे असे वाटते. प्रेमऋतू ही असाच अचानकपणे फुलून येतो आणि जीवन कृतार्थ करतो. तशीच कृतार्थतेची भावना हा गझल संग्रह आपल्या हाती देतांना आम्हा दोघांच्याही मनात आहे .हा  गझलसंग्रह दोनशे रुपयात घरपोच मिळू शकतो.त्यासाठी (९८ ५०८ ३० २९० ) या क्रमांकावर संपर्क साधावा.

   आपल्याला हा गझलसंग्रह कसा वाटला ते आवर्जून कळवावे ही अपेक्षा आहेच.


                             आपले स्नेहांकित

                      गझलनंदा / प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post