एसआरए योजनेतून दापोडी परिसर कायमस्वरुपी वगळावा......शिवसेना खासदार श्रीरंग बारणे


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : दापोडीतील जय भिमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर येथील नियोजित एसआरए प्रकल्पाला स्थानिक ९०% टक्के नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांच्या विरोधाच्या हजारो हरकती आहेत. त्यांना ‘एसआरए’ प्रकल्प नको असतानाही केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी एसआरए प्रकल्पाचा घाट जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. तसेच एसआरए योजनेतून दापोडी परिसर कायमस्वरुपी वगळावा अशी मागणीही त्यांनी केली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, दापोडीतील एसआरए प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत होणार आहे. येथील जवळपास ९०%टक्के नागरीकांचा विरोध असतानाही महापालिका ठेकेदारांना पोसण्यासाठी हा प्रकल्प करीत आहे का ? स्मार्ट सिटीत शहर स्मार्ट झाले का? कोणताही प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार करणे आवश्यक आहे. एखादा प्रकल्प राबविण्यासाठी स्थानिक ५०% टक्के नागरिकांचा विरोध असेल. तर, तिथे प्रकल्प राबवू नये असा राज्य शासनाचा निर्णय आहे. दापोडीतील प्रकल्पाला ९०%टक्के नागरिकांचा विरोध असतानाही प्रकल्प राबविण्याचा घाट कशासासाठी घातला जात आहे. केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठीच एसआरए प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. मागील पाच वर्षात प्रशासन, कारभा-यांनी ठेकेदाराला पोसण्याचे काम केले.

महापालिकेने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पाच ठिकाणी प्रकल्प केले आहेत. याचा बांधकाम दर बाजार भावापेक्षाही जास्त आहे. परंतु, त्या प्रकल्पातील बांधकामाचा दर्जाही तपासला जावा अशीही मागणी खासदार बारणे यांनी केली.

माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या की, वीस वर्षांपुर्वी येथे साधी घरे होती. आता दोन, तीन मजले घरे झाली आहेत. येथे अनेक कुटूंबे राहतात. येथील नागरीकांवर एसआरएची टांगती तलवार आहे. नागरिकांकडे सात बारा आहे. मिळकत कर भरतात. एसआरए कायमस्वरुपी रद्द करावे यासाठी बहुतांशी नागरीकांची मागणी आहे. तरी, महापालिका बजेटमध्ये या प्रकल्पाच्या हेडवर तरतूद करत आहे. आता या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. सोमवारी होणा-या या एल्गार महामोर्चात येथिल सर्व नागरीक सहभागी होणार आहेत.

माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, या ठिकाणी असणा-या नागरीकांना विश्वासात न घेता प्रशासन हा प्रकल्प करु पाहत आहे. या नागरीकांना टोलेजंग तीन चार इमारती बांधून घरे द्यायची आणि उर्वरीत जागेचे खासगीकरण करायचे असा प्रशासनाचा हेतू आहे. या प्रकल्पात भ्रष्टाचाराचा वास येत आहे.

दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज (शनिवारी) पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. एसआरए प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करावा यासाठी दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी महापालिकेवर एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे.


अनवरअली शेख : पुणे जिल्हा प्रतिनिधी :

*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post