महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसलाच त्याचा फटका बसण्याची शक्‍यता

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे :महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच; महाविकास आघाडीत पीएमआरडीएच्या नियोजन समिती निवडणुकीवरून फूट पडली आहे.

या निवडणूकीसाठी कॉंग्रसने राष्ट्रवादी तसेच शिवसेनेची विनंती धुडकावत पुण्यातून उमेदवार उभा केल्याने कॉंग्रेसने महापालिका निवडणूकांसाठी या तीनही पक्षात होणाऱ्या आघाडीत मिठाचा खडा टाकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित जाण्याचा सूचक संदेश देत वाटचाल केली असून त्यामुळे पुढील महापालिका निवडणूका शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सांगत कॉंग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्याचा थेट इशारा दिला आहे.

जगताप म्हणाले की, ' पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 22 जागांसाठी 23 अर्ज आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे संख्याबळ, राष्ट्रवादीचे संख्याबळ आणि शिवसेनेची संख्या व अतिरिक्‍त संख्याबळ पाहता. 22 मध्ये राष्ट्रवादीचे 7 भाजपचे 14 शिवसेनेचा 1 सदस्य मतांच्या कोट्यानुसार निवडून जाणार हे अपेक्षित होते. पिंपरीत कॉंग्रेसचे 0 नगरसेवक आहेत. पुण्यात 10 सदस्य आहेत. तर निवडून येण्याचा कोटा 13 मतांचा आहे. तरी
सुद्धा उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातही कॉंग्रेसकडे एकूण संख्याबळ नसताना कॉंग्रेसला जिल्ह्यात एक जागा देऊ केली.

त्यामुळे कॉंग्रेसने नागरी क्षेत्रात अर्ज भरणे अथवा उमेदवारी अर्ज ठेवणे अपेक्षित नव्हते. त्या पलीकडे जाऊन महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत एकवाक्‍यता असणे आवश्‍यक आहे. अशी भूमिका कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी घेणे अपेक्षित होते.काही मंडळीकडून आघाडीच्या सोबत जाण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी समितीने अस्तित्व अवघ्या दोन अडीच महिन्यांचे आहे. त्याची जेमतेम एक बैठक होईल. हे सगळं असताना कॉंग्रेसने खोडसाळपणे अर्ज दाखल केला. त्यामुळे ज्या प्रमाणे दुधात मिठाचा खडा पडतो तशी आघाडीत कटूता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

कॉंग्रेस मध्ये ही फूट…...

कॉंग्रेसने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरून कॉंग्रेसच्या शहर पदाधिकारी आणि नगरसेवकांमधेही जोरदार खडाजंगी झाली. मंगळवारी ( दि. 9 ) शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार असलेल्या नगरसेवकांची बैठक बोलाविली होती.या बैठकीत, नगरसेवकांनी अर्ज भरताना कोणतीही कल्पना पक्षाकडून का देण्यात आली नाही अशी विचारणा केली. प्रदेशाध्यक्षांचाही अर्ज भरण्याबाबत सूचना नसताना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे आपला उमेदवार मते नसल्याने निवडून येणार नसताना तसेच या अर्जाने आघाडीत वाद होण्याची शक्‍यता असताना का अर्ज भरण्यात आला अशी विचारणा नगरसेवकांनी केली.

त्यावर, काही शहर पदाधिकाऱ्यांनी आपल्यालाही अर्ज भरण्याबाबत कल्पना नसल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षात एकमत नसल्याने कॉंग्रेसमधील दुही पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली असून महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसलाच त्याचा फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post