विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला...

भाजपकडून उमेदवारीवर अद्याप खलबते सुरू आहेत.

दोन्ही आघाड्यांकडून सावध मोर्चेबांधणी सुरू.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महाविकास आघाडीतर्फे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे, तर दुसरीकडे विरोधी भाजपकडून उमेदवारीवर अद्याप खलबते सुरू आहेत.भाजपचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी तालुक्या-तालुक्यांमध्ये आकडेमोड मात्र सुरू झाली आहे. कोण कोणाकडे, याचे आडाखे बांधले जात आहेत. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचारात आणखी रंगत येणार असली तरी दोन्ही आघाड्यांकडून सावध मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

करवीर : 'महाविकास'कडे 9, भाजपकडे 3 मतदार

कुडित्रे : करवीर तालुक्यातून जिल्हा परिषदेचे 11 सदस्य आणि पंचायत समिती सभापती असे 12 मतदार विधान परिषद मतदानास पात्र आहेत. सभापती मंगल पाटील काँग्रेसच्या सदस्या आहेत. करवीर पंचायत समितीमध्ये काँग्रेस 14, शिवसेना 4 ,भाजप 3 व राष्ट्रवादी 1 असे बलाबल आहे.

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 2, भाजप 3 व अपक्ष 1 असे बलाबल आहे. शिंगणापूरच्या रसिका पाटील अपक्ष म्हणून निवडून आल्या असल्या तरी त्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थक मानल्या जातात. महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषदेमधील काँग्रेसचे 5, शिवसेनेचे 2, अपक्ष 1 आणि पंचायत समिती सभापती असे 9 मतदार आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे तीन सदस्य आहेत.

शिरोळ तालुका : 74 मते ठरणार निर्णायक

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ जि.प.सदस्य व पं.स.सभापती असे एकूण 74 मतदार आहेत. शिरोळ व हातकणंगले हे दोन तालुके या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून विद्यमान आमदार सतेज पाटील यांचे समर्थक व भाजपची उमेदवारी निश्चित नसली तरी महाडिक गट व आवाडे गट यांच्याकडून मताची जुळवाजुळव करण्यासाठी बैठका सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटीलयड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. अशातच विधान परिषदेची निवडणूक लागल्याने तालुक्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. कारण, मंत्री यड्रावकर यांच्याकडे निर्णायक मते आहेत.


कुरुंदवाड : उमेदवारावर ठरणार मताचे 'गणित'

कुरुंदवाड : कुरुंदवाडमध्ये 20 नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालिकेत सध्या काँग्रेसचे 7, राष्ट्रवादीचे 5, भाजपचे 5, अपक्ष 1 व 2 स्वीकृत असे संख्याबळ आहे. कुरुंदवाड पालिकेत काँग्रेसचे 6 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, 1 स्वीकृत आणि अपक्ष नगरसेविका प्राजक्ता पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. भाजपच्या उमेदवारावर मताचे 'गणित' ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 14 मतांची बेरीज सध्यातरी पक्की समजली जात आहे. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी 2016 सालच्या निवडणुकीत भाजपचे पॅनेल लावले होते. थोड्या मतात त्यांचा पराभव झाला होता. 6 नगरसेवकांसह स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी सभागृहात पुन्हा एंट्री केली. नगरसेविका सुशीला भबिरे यांचे निधन झाल्याने भाजपच्या स्वीकृत नगरसेवकासह 6 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

आजरा : चराटी गटाची भूमिका ठरणार महत्त्वाची

आजरा : आजरा नगरपंचायत निर्मितीनंतर प्रथमच नगरसेवकांना विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे आजरा तालुक्यात तब्बल 20 मतांची वाढ होऊन तालुक्याची मतदार संख्या 24 झाली आहे. यात आजरा नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा, 17 नगरसेवक व 2 स्वीकृत नगरसेवक असे मिळून 20 मतदार आहेत. यामध्ये भाजपप्रणित ताराराणी आघाडीकडे 11, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2, शिवसेना 1 तर 2 अपक्षांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. पंचायत समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. एकूण 24 मतदारांपैकी भाजपच्या अशोक चराटी गटाकडे 13, तर राष्ट्रवादीकडे 6 मतदार आहेत. त्यामुळे तालुक्यात चराटी गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गडहिंग्लज : समान संधी, जनता दलाकडे लक्ष

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतील सत्तारूढ जनता दलाकडे 22 पैकी तब्बल 15 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक कोणासोबत जाणार, याबाबत आज कोणतेही चित्र अंतिम नसून, दोन्हीही बाजूंचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत. उर्वरित राष्ट्रवादीचे सहा व शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. याशिवाय तालुक्यात पाच जि. प. मतदार संघांपैकी गिजवणे मतदारसंघाचे सतीश पाटील हे राष्ट्रवादीचे, तर भाजपकडे अ‍ॅड. हेमंत कोलेकर, अनिता चौगुले, ताराराणी आघाडीकडे रेखा हत्तरकी व अप्पी पाटील गटाच्या राणी खमलेट्टी या आहेत. त्यामुळे एक महाविकास आघाडीकडे, तर उर्वरित जागा विरोधी गटाकडे आहेत. पंचायत समिती सभापती ताराराणी आघाडीच्या आहेत. तालुक्यातील 28 पैकी 8 मते महाविकास आघाडीकडे , उर्वरित 4 मते विरोधकांकडे, 1 मत दोलायमान, तर जनता दलाची 15 मते कोणाकडे जातील, हे सांगता येत नाहीत.

चंदगड : महाविकास आघाडीकडे संख्याबळ अधिक

चंदगड : चंदगडला पक्षीय बलाबल सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने मजबूत आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे. आ. राजेश पाटील गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक सत्तेत आहेत.

नगरपंचायतीत 17 नगरसेवक असून, पंचायत समितीचे सभापती, चार जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मतदार संख्या 25 होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे चार, भाजपचे सहा, अपक्ष चार असे बलाबल आहे. सध्या महाविकास आघाडीचे 14, तर विरोधी भाजपचे सहा सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2 असे सदस्य आहेत. काँग्रेसचे बल्लाळ हे आता भाजपचे झाले आहेत. पं.स. सभापती अनंत कांबळे हे गोपाळराव पाटील गटाचे आहेत. 25 मतदारांपैकी महाविकास आघाडी 18, तर भाजप 7 असे बलाबल आहे.

शाहूवाडी : पं.स., जि.प.वर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात 25 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यात मलकापूर नगरपरिषदेचे 19 नगरसेवक, नगराध्यक्ष असे 20 मतदार आहेत, तर 4 जि.प. सदस्य व 1 पंचायत समिती सभापती यांचा समावेश आहे.

तालुक्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची, तर दुसर्‍या बाजूला जनसुराज्य पक्ष – काँग्रेस-भाजप अशी एक आघाडी आहे. नगरपरिषदेवर जनसुराज्य-काँग्रेस व भाजप आघाडीची सत्ता आहेत. 20 पैकी 11 सदस्य आघाडीचे आहेत, तर विरोधी शिवसेना- राष्ट्रवादी कडे 9 सदस्य आहेत.

पंचायत समिती व जि.प. वर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामध्ये 3 जि.प. सदस्य व 1 पंचायत समिती सभापती असे 4 मतदार शिवसेना-राष्ट्रवादीकडे आहेत. जनसुराज्य व काँग्रेस आघाडीकडे 1 जि.प. सदस्य आहे. शिवसेनेचे सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिगराव गायकवाड यांनी महाविकास आघाडीस पाठिंबा दिला आहे, तर जनसुराज्य व भाजपने अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post