विधान परिषद निवडणूक साठी आता आकड्यांचा खेळ सुरू

कोण कोणाकडे राहणार..?  याचे अंदाज बांधण्याचे काम सुरू झाले


बारा तालुक्यांपैकी या चार तालुक्यांतीलच मतदारसंख्या निवडणुकीचा निकाल ठरविणारी असेल.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा 


जगदीश अंगडी : ( कार्यकारी संपादक )
 :

 कोल्हापूर : विधानपरिषद निवडणूक साठी आता जोरदार आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. कोण कोणाकडे राहणार याचे अंदाज बांधण्याचे काम सुरू झाले आहेत. निवडणुकीत जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये 417 मते असून त्यातील निम्म्यापेक्षा अधिक मते केवळ हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर नेत्यांचे अधिक लक्ष राहणार आहे. हे दोन तालुके डोळ्यांसमोर ठेवूनच भाजप उमेदवारांच्या नावाची चर्चा करीत आहे.

काही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हळूहळू रंग भरू लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील आखाड्यात असणार आहेत. भाजपकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांत ते उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी सुरू झाल्याने ग्रामीण भागात त्याची आता चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगरपालिकेचे नगरसेवक यांना मतदानाचा अधिकार असल्याने या निवडणुकीसाठी 417 मतदार निश्चित झाले आहेत.

जिल्ह्यातील 417 मतदारांपैकी हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांतील मतदारांची संख्या निम्यापेक्षा अधिक म्हणजे 213 इतकी आहे. ही मते निर्णायक आहेत. या दोन तालुक्यांवर उमेदवारांचे चांगले लक्ष आहे. त्याच्या जोडीला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात साधारणपणे 50 मतदार आहेत. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी या चार तालुक्यांतीलच मतदारसंख्या निवडणुकीचा निकाल ठरविणारी असेल.

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी ही मोठी नगरपालिका आहे. यात 67 नगरसेवक आहेत. नव्याने झालेल्या हातकणंगले नगरपालिकेचे 19, हुपरी नगरपालिकेचे 21 नगरसेवक, पेठवडगाव नगरपालिकेचे 20 नगरसेवक, तसेच जिल्हा परिषदेचे 11 सदस्य आणि पंचायत समिती सभापती अशी मते या तालुक्यात आहेत. लगतच्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर ही मोठी नगरपालिका आहे. या नगरपालिकेचे 28, तर कुरूंदवाड नगरपालिकेचे 20 नगरसेवक आहेत. नव्याने झालेल्या शिरोळ नगरपालिकेचे 19 सदस्य आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेचे सात मतदारसंघ आहेत. त्यापैकी एक जागा रिक्त आहे. त्यामुळे या निवडणुकीत सहा मतदार आहेत. या दोन तालुक्यांतील मतांची बेरीज 213 इतकी होते.

पन्हाळा व शाहूवाडी या दोन तालुक्यांतील मतदारांची संख्या 50 इतकी आहे. पन्हाळा नगरपालिकेचे 19, पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषदेचे 6 सदस्य आहेत. शाहूवाडी तालुक्यात मलकापूर नगरपालिकेचे 20 नगरसेवक, पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषदेचे 6 सदस्य आहेत. बारापैकी वरील चार तालुक्यांमध्ये 417 पैकी 262 मतदार आहेत. त्यामुळे या तालुक्यातील मतदार संख्या डोळ्यांसमोर ठेवूनच उमेदवारांचे नियोजन सुरू आहे. हे तालुके ज्या उमेदवारांना साथ देतील, त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.

तालुका निहाय मतदान

  • आजरा : 24
  • भुदरगड : 05
  • चंदगड : 25
  • गडहिंग्लज : 28
  • गगनबावडा : 3
  • हातकणंगले : 139
  • कागल : 49
  • करवीर : 12
  • पन्हाळा : 26
  • राधानगरी : 6
  • शाहूवाडी : 25
  • शिरोळ : 74

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

जगदीश अंगडी कार्यकारी संपादक :

99606 46084

Post a Comment

Previous Post Next Post