पती पत्नीच्या भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील दहा घरांना लागली भीषण आग



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पती पत्नीच्या भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील दहा घरांना भीषण आग लागल्याची घटना काल सायंकाळी पाटण तालुक्यातील माजगाव येथे घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने या दहा घरांतील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी संजय पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माजगाव येथील संजय रामचंद्र पाटील व त्याची पत्नी पालवी यांचे दिवसभर भांडण सुरू होते. या भांडणातून संजय पाटील याने स्वतःच्या राहत्या घराला आग लावली. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णात पाटील, पंढरीनाथ पाटील, गोरखनाथ पाटील व आनंदराव पाटील यांच्या 10 घरांना भीषण आग लागली.

घटनेची माहिती मिळताच पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर यांच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले होते. आगीची माहिती मिळताच सरपंच प्रमोद पाटील, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सिद्धांत शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. याप्रकरणी संजय पाटील याला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post