सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे कारवाई न करता माघारी जावे लागले

 

स्थानिक झोपडपट्टी वासीयांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील.

नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला शुक्रवारी (दि. 22) भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे कारवाई न करता माघारी जावे लागले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. 

नवीन पनवेल सेक्टर 1 एस शबरी हॉटेलच्या बाजूला गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ 108 झोपड्या असलेली भीमनगर झोपडपट्टी आहे. येथील रहिवासी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. महिला आजूबाजूच्या सोसायटीत जाऊन घरकाम करतात. सिडकोचे अधिकारी शुक्रवारी ही झोपडपट्टी अनधिकृत असल्याचे सांगत कोणतीही नोटीस न देता ती पाडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घेऊन आले. या बाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना समजताच ते स्वतः त्या ठिकाणी येऊन सिडकोचे पथक परत जाईपर्यंत तेथे बसून राहिले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे सहाय्यक नियंत्रक दुबल यांना या झोपड्या पाडण्याला आमचा विरोध असल्याचे सांगून ते आपल्या सहकार्‍यांसह त्या ठिकाणी ठिय्या मारून बसले. या वेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका चारुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, संतोष भोईर, शिवाजी भगत, आंग्रे, आर. जे. म्हात्रे, झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष आनंद म्हसके होते. आमदारांनी या वेळी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना फोन करून या लोकांनी येथून उठून कोठे जायचे याचा निर्णय प्रथम घ्या, मगच त्यांच्या झोपड्या पाडा, असे सांगितले. त्यामुळे सिडकोचे पथक कोणतीही कारवाई न करता तेथे बसून राहिले. अखेर संध्याकाळी 5.30 वाजता सिडकोचे पथक आणि पोलीस माघारी गेल्यावर स्थानिक झोपडपट्टी वासीयांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला.

केंद्र आणि राज्य सरकारने बेघर असलेल्यांना स्वतःचे मालकीचे घर 2022पर्यंत देण्यासंदर्भात योजना आखल्या आहेत. दुर्दैवाने भीमनगर झोपडपट्टी ही सिडकोच्या हद्दीत येत असून त्याबाबत सिडकोने कोणतीही योजना आखलेली नाही. येथील प्लॉट हा देण्यात आल्याने आज हे पथक झोपड्या पाडण्यासाठी येथे आलेले आहे. मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना याबाबत सिडकोने आपले धोरण लवकरात लवकर आखले पाहिजे, अशी विनंती केली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अशी कारवाई केली जात नव्हती. त्यानंतरच्या काळात सिडकोने धोरण ठरवले तर नाहीच, पण इतर महापालिका झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करीत असताना सिडको कारवाई करीत आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आलो आहोत, असे या वेळी माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे म्हणाल्या की, भीमनगर झोपडपट्टी 2005 पासून येथे वसली आहे. नगरपालिका असताना आणि आता महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत येथील सर्व्हे केला आहे, पण ही झोपडपट्टी सिडको वसाहतीत येत असल्याने सिडकोने तुम्ही आमच्या वसाहतीमधील झोपडपट्ट्यांचा सर्व्हे करू नका, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पत्र दिले आहे. आज कोणतीही सूचना न देता त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली हे योग्य नाही.

मी 15 वर्षे येथे राहत आहे. आजूबाजूच्या सोसायटीत जाऊन घरकाम करते. माझ्या घरात दुसरे कोणी कमावणारे नाही. आतापर्यंत चार-पाच वेळा आमची घरे पाडली. आम्ही उघड्यावर चार-चार महिने उन्हात आणि पावसात राहिलो आहे. आज सकाळपासून आम्ही कोणीही कामावर न जाता घरीच आहोत. कोणाच्या घरी जेवणही शिजले नाही. आमदार प्रशांतदादा आल्यामुळे आज कारवाई झाली नाही. त्यांचे आम्ही आभारी आहोत.

मी 15 वर्षे येथे राहत आहे. आजूबाजूच्या सोसायटीत जाऊन घरकाम करते. माझ्या घरात दुसरे कोणी कमावणारे नाही. आतापर्यंत चार-पाच वेळा आमची घरे पाडली. आम्ही उघड्यावर चार-चार महिने उन्हात आणि पावसात राहिलो आहे. आज सकाळपासून आम्ही कोणीही कामावर न जाता घरीच आहोत. कोणाच्या घरी जेवणही शिजले नाही. आमदार प्रशांतदादा आल्यामुळे आज कारवाई झाली नाही. त्यांचे आम्ही आभारी आहोत.

-सुनीता वाकोरे, झोपडीधारक

मी लहानाचा मोठा येथेच झालो. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत आहे. आमच्या येथे एकूण 108 घरे आहेत. दर चार वर्षांनी आमची घरे पाडली जातात. दर वेळी घरे पाडायची आणि आम्ही पुन्हा बांधायची हेच चालू आहे. आमच्याबाबत काही तरी निर्णय घ्या हीच आमची आमदार प्रशांत दादांना विनंती आहे.

-विकास राणे, झोपडीधारक

Post a Comment

Previous Post Next Post