एकच फ्लॅट दोघांना विकून फसवणूक : बिल्डर उमेश पवार, वकील कणसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

 

शारदा बँकेच्या गहाळपणामुळे एकाच फ्लॅटवर दोन कर्ज व्यवहार.

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :खोटा सर्च रिपोर्ट आणि कागदपत्रे दाखवून एकच फ्लॅट दोघांना विकल्याने धनकवडीतील बिल्डर उमेश पवार , दस्तऐवज करून देणारे त्यांचे वकील कणसे ( पूर्ण नाव माहित नाही )यांच्या विरुध्द कात्रज मधील डॉ. दीपक शिंदे यांच्या पत्नी स्वरूपा शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी राजगड पोलिस ठाण्यात  भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४   नुसार गुन्हा नोंद झाला आहे. शारदा बँकेच्या गहाळपणामुळे एकाच फ्लॅटवर दोन कर्ज व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बिल्डरने दोघांना एकच फ्लॅट विकल्यावर स्वतःही त्या प्लॅटवर कर्ज काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकेचे धायरी शाखेचे तत्कालिन व्यवस्थापक पारखी निलंबित झाले असल्याची माहिती सहकर्जदार डॉ. दीपक शिंदे यांनी  पत्रकाद्वारे दिली आहे

खोपी ( ता. भोर ) येथे तोरण स्पर्श इमारतीमधील सदनिका उमेश पवार याने खोटे सर्च रिपोर्ट आणि कागदपत्रे देऊन  सहकर्जदार डॉ. दीपक शिंदे यांच्या पत्नी , कर्जदार स्वरूपा शिंदे यांना १८ लाखांना  विकली. प्रत्यक्षात हीच सदनिका पवार याने विपुल नरवडे यांना विकलेली होती. नरवडे यांच्या वतीने श्री.दास यांनी त्यामुळे शिंदे नसताना  त्यांच्या ताब्यातील सदनिकेचा ताबा घेतला. या सदनिकेपोटी १५ लाखाचे शारदा सहकारी बँकेचे  कर्ज स्वरूपा शिंदे, डॉ. शिंदे यांना सदनिका ताब्यात नसताना फेडावे लागत आहे. बिल्डर उमेश पवार याला शारदा बँकेने खोट्या दस्तावेजा आधारे कर्ज दिल्याने बँक देखील दोषी असल्याचे स्वरूपा शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.राजगड पोलिस स्टेशनचे  ठाणे अंमलदार सतीश पाटील, हेड कॉन्स्टेबल सतीश भानुदास चव्हाण अधिक तपास करीत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post