ससून सर्वोपचार रुग्णालयात जन्म-मृत्यू दाखले देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा येत्या १ नोव्हेंबरपासून कार्यान्वित होणार

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात जन्म-मृत्यू दाखले देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा येत्या १ नोव्हेंबरपासून कार्यान्वित होणार आहे.या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची सोय झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागावरील ताण बऱ्यापैकी कमी झाला आहे.

ससूनमध्ये दरवर्षी सुमारे नऊ ते दहा हजार नागरिकांचा मृत्यू होतो, तर तितक्‍याच संख्येने बाळेही जन्माला येतात. त्यामुळे वर्षाला सुमारे २० हजार दाखले द्यावे लागतात. हे दाखले घेण्यासाठी नागरिक तेथील जवळ असलेल्या आणि ससून रुग्णालय ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेत येते त्या ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करत होते. त्यामुळे या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या दाखल्यांमध्ये ४०-४५ टक्‍के दाखले हे केवळ एकट्या ससूनमधीलच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण येत होता. आता हा ताण या स्वतंत्र व्यवस्थेमुळे हलका झाला आहे.

पूर्वी हे दाखले मिळण्यासाठी एकच कार्यालय होते. मात्र, त्याचे विकेंद्रीकरण करून ते १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागले गेले. अन्य शहरांमध्ये अशा मोठ्या रुग्णालयांमध्ये जन्म-मृत्यू दाखले देण्याला स्वतंत्र कक्ष या आधीच स्थापन केले गेले आहेत. पुण्यातही औंध जिल्हा रुग्णालयात ही सोय आहे. परंतु, ससूनमध्ये अद्याप ती सोय उभारण्यात आली नव्हती. जी आता सुरू होत आहे.

या सोयीमुळे एखाद्या व्यक्‍तीचा ससूनमध्ये मृत्यू झाला, तर त्याच्या पार्थिवाबरोबरच नातेवाइकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकते, किंवा एखादे बाळ जन्मले तर आई-बाळाला डिस्चार्ज देताना त्याचे जन्मप्रमाणपत्र त्याला मिळू शकते. ज्यामुळे नागरिकांना कोठेही आणि नंतर कधीही खेटे घालण्याची वेळ येणार नाही. ससूनमध्ये जवळपास ४०-४५ टक्‍के नागरिक हे पुणे महापालिका हद्दीबाहेरून, ग्रामीण भागातून किंवा अन्य जवळपासच्या शहरांमधून उपचारासाठी येतात. त्यांना या व्यवस्थेचा जास्त उपयोग होणार आहे.

ही व्यवस्था सुरू होण्यासाठी रुग्णालयाकडून नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेकडून या व्यवस्थेसाठी स्टेशनरी आणि संगणकाची सोय करून देण्यात आली आहे. या प्रमाणपत्रावर उपनिबंधकाची स्वाक्षरी असणे आवश्‍यक आहे. ती नेमणूक करण्याची जबाबदारी ससूनची आहे. या यंत्रणेसाठी राज्य सरकारकडून त्यांना लॉगीन आयडीही मिळाला आहे.

- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Post a Comment

Previous Post Next Post