325 एकर जमीन कर्जत खालापूरचे लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांच्या नावावर, शेतकऱ्यांची फसवणूक...- राष्ट्रवादीचे भूषण पाटील


 प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील : 

खालापुरात एम.आय.डी.सी.साठी घेतलेल्या जमिनी कंपनीकडून खाजगी मालकांच्या नावे - 325 एकर जमीन कर्जत खालापूरचे लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांच्या नावावर,  शेतकऱ्यांची फसवणूक - राष्ट्रवादीचे भूषण पाटील यांचा आरोप 


खालापूर तालुक्यातील नारंगी एम.आय.डी.सी. होऊ पाहत असल्याने यासाठी नारंगी, गोहे, खरीवली सह अन्य गावामध्ये जमिनी चांगले भाव आले असताना या एम.आय.डी.सी. साठी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनी कंपनी कडून खाजगी माणसांच्या नावे केल्या जात असून यात कर्जत खालापूरचे लोकप्रतिनिधीचा हात असून त्यांच्याच नातेवाईकांच्या नावे खरेदी खत केले जात असल्याचे उघड करीत या भागातील राष्ट्रवादीचे युवक उपजिल्हाध्यक्ष भूषण पाटील यांनी यात शासनाला दिलेले धनादेश ही वाटले नसल्याने ही शासनाची ही फसवणूक असल्याचे पाटील यांनी सांगत याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

                 खालापूर तालुक्यात एम.आय.डी.सी. चा प्रकल्प नारंगी हद्दीत येत असल्याने विकासाला चालना मिळणार असल्याने सुरुवातीला जमीन विक्री साठी स्थानिकांचा विरोध असताना शेतकऱ्यांना अडचणी सांगून न्युमिलेनियम इंडिया प्रा.ली यांनी जमिनी खरेदी केल्या आणि विकासाचे चित्र उभे केले, मात्र त्याच खरेदी केलेल्या जवळपास 325 एकर जमीन कर्जत खालापुरातील लोकप्रतिनिधीनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे केल्या आहेत असा थेट आरोप  भूषण पाटील यांनी केला.

  तर यात शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांना न्याय देण्यासाठी आपण पुढे आलो आहे, असे भूषण पाटील यांनी सांगून याबाबत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ही कैफियत मांडली असून यात लक्ष घालून शासनाची व शेतकरी वर्गाची फसवणूक होण्यापासून वाचवावे अशी विनंती केली.  तसेच माझ्या जीविताला धोका झाल्यास त्याला हे प्रकरण जबाबदार असेल असे सांगून मी राष्ट्रवादीचा युवक उपजिल्हाध्यक्ष असून समाजात मिरवत असतो. त्यामुळे ज्या माणसांमुळे आहोत त्याची फसवणूक होत आहे ही बाब पटत नसल्याने आपण ही बाब खासदार सुनील तटकरे साहेब व माजी आमदार जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांची मागील सहा महिन्यांपासून कानावर घातली आहे. 

मात्र महाविकास आघाडी असल्याने वरून दबाव आल्यानंतर वेगळा निर्णय घेता येणार नाही त्यामुळे ते आघाडीचा धर्म पाळत आहेत. त्यामुळे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा ही दिला आहे, जमल्यास सदस्य पदाचा ही राजीनामा देऊन बाजूला होईन पण याला वाचा फोडून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यात पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालावे अशी विनंती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post