मुसळधार पावसाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापूर :   अवकाळी मुसळधार पावसाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना  चांगलेच झोडपून काढले. सखल भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.नुकत्याच झालेल्या गुलाब चक्री वादळाचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही दिसून आला.  ठिकठिकाणी पावसाची हजेरी आणि थंड वाऱ्यामुळे ताप, थंडी, सर्दीच्या रुग्णांत वाढ झाली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत कधी ढगाळ, तर कधी कडकडीत उन्हाच्या झळा असे वातावरण झाले होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. आज दिवसभर कडकडीत ऊन होते. त्यामुळे उकाडय़ाचा त्रास जाणवत असताना, दुपारी तीननंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसाने सर्वांची दैना उडाली. जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला.

सांगली शहरासह जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास सलग पाऊस कोसळत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. या हंगामातील सर्वात मोठा पाऊस म्हणून नोंद व्हावी असा पाऊस आज कोसळला. सांगली शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. सलग दीड तास पावसाने जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपून काढले, ढगफुटीसदृश्य पाऊस सांगली शहरात झाला.


Post a Comment

Previous Post Next Post