पोलीस महासंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे पोलीस आयुक्तालयाने 416 गुण (94 टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळविला .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : शहरातील गंभीर घटनांमध्ये गुन्ह्यांची तत्काळ उकल करून पुणे पोलिसांनी सर्वोत्कृष्ट घटक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे पोलीस आयुक्तालयाने 416 गुण (94 टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती महासंचालक कार्यालयास सादर केली होती.

पुणे पोलीस आयुक्तालयातील 2020 मधील एकुण वार्षिक कामगिरीचा आढावा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह पिटा कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, माहीती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल होणारे गुन्हे, गुन्हेगारांविरूध्द प्रभावी कारवाई (मोका,एमपीडीए, तडीपार ), दिर्घ काळापासुन फरार असलेले आरोपी पकडणे, दुर्बल घटकांविरूध्द दाखल गुन्हयांची तत्काळ उकल करणे, हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, महिला व बालके अत्याचारांविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयांबाबत विहीत कालावधीत कार्यवाही करणे, अपघाताची संख्या कमी करणे, मुद्देमालीची निर्गती करणे, श्वान पथक व अंगुली मद्रा यांचा वापर करून तांत्रिक तपास करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते.

जातिय व सामाजिक सलोखा ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध योजना राबविणे तसेच वाहतुक सुरक्षित व सुरळित होईल यासाठी नियोजन करणे इत्यादी विविध मुद्दयांसाठी एकुण 445 गुण ठेवण्यात आले होते. त्यानुसार निवड समितीने दिलेल्या गुणांनुसार पुणे आयुक्तालयाने 416 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यातील पोलीस घटकांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होवून कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे पोलिसांनी बाजी मारली आहे. सर्व घटनांसंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने कामाची वाहवा झाली आहे. त्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतचा सहभाग महत्वाचा आहे. - अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Post a Comment

Previous Post Next Post