यंत्रमागासाठीच्या वीज बिल सवलतीसाठी सुरु असलेल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया संदर्भात येत्या गुरुवारी आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक होणार.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  यंत्रमागासाठीच्या वीज बिल सवलतीसाठी सुरु असलेल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया संदर्भात येत्या गुरुवारी आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक घेऊन त्याला स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर 27 अश्‍वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांच्या अतिरिक्त सवलतीची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज चालू बिलासह मागील थकबाकी 30 टक्के भरुन व उर्वरीत रक्कम समान हप्त्यात भरण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. एकूणच आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या पुढाकाराने वस्त्रोद्योगाला भेडसावणारे महत्वाचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागून यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करणार्‍या वस्त्रोद्योगाला नवसंजिवनी मिळण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सध्या वस्त्रोद्योगाला विशेषत: यंत्रमाग व्यवसायाला मदतीची गरज असून राज्य शासनाने तातडीने जाहीर घोषणांची अंमलबजावणी करावी यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यादरम्यान आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात भेट घेतली.

यंत्रमागाच्या थकीत वीज बिलासाठी प्रथमत: 30 टक्के रक्कम भरुन उर्वरीत रकमेसाठी समान हप्ते करुन देण्यात आले. परंतु मार्चमध्ये त्याची मुदत संपल्याने वीज बिलाचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला होता. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार आवाडे यांनी वस्त्रोद्योगाची सद्यस्थिती व कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती याची विस्तृत माहित देत ही सवलत सुरु ठेवण्याची मागणी केली. त्यावर मंत्री राऊत यांनी सुधारणा करत चालू बिलासह मागील थकबाकी 30 टक्के भरुन उर्वरीत समान हप्ते करण्यासंदर्भात सूचना करत या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post