सीबीआय च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट ...?



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता सीबीआय च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आल्या संदर्भात एक अहवाल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थात अद्याप याबाबत सीबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या अहवालाबाबत सीबीआय सोडून कुणीही सत्य सांगू शकत नाही. आता याबाबत सत्य लोकांसमोर आणलं लोकांची मिडियाची आणि त्यांची जबाबदारी आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

व्हायरल अहवालात काय म्हटलं आहे?
या अहवालात सांगितलं आहे की, ही प्राथमिक चौकशी बंद करावी, अशी शिफारस ही चौकशी करणारे सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी आपल्या 65 पानी अहवालात केल्यानंतरही सीबीआयने देशमुखांवर गुन्हे दाखल केले. हा अहवाल सीबीआयने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.

सचिन वाझे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. कार्यालयीन ब्रिफिंगसाठी अन्य अधिकार्‍यांसोबत ते एकत्र आले याशिवाय त्यांची दोघांची भेट झालेली नाही. सचिन वाझे यास पुन्हा पोलीस दलात घेण्याचा आणि त्यानंतर दोनच दिवसांत गुन्हे गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी त्याला बसवण्याचा निर्णय हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरच झाला. अन्य वरिष्ठांना डावलून वाझे थेट परमबीर यांना रिपोर्ट करत. अत्यंत संवेदनशील प्रकरणे वाझेकडेच चौकशीसाठी परमबीर यांच्या आदेशानेच दिली जात असल्याचे तत्कालीन गृहमंत्र्यांच्याही लक्षात आले होते. एंन्टिलियासमोर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला सोबत आणले होते. त्यास अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी तेव्हा आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकांना सचिन वाझे परमबीरसोबत नेहमीच जात. परंतु, तत्कालीन गृहमंत्र्यांशी वाझेचे व्यक्तिगत बोलणे नव्हते. या दोघांचीच भेट कधीही झाली नाही. अशा भेटीचे कोणतेही पुरावे नाहीत. अनिल देशमुख किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनी ऑर्केस्ट्रा बार/हुक्का बार मालकांकडून पैसे वसूल करण्याची मागणी सचिन वाझे, एसीपी संजय पाटील किंवा डीसीपी राजू भुजबळ यांच्याकडे केल्याचा कुठलाच पुरावा नाही, असे हा अहवाल म्हणतो. पलांडे यांनीही हे आरोप फेटाळले. तत्कालीन गृहमंत्र्यांनी थेट किंवा संजीव पलांडे यांच्यामार्फत पैसे वसूल करण्याची मागणी केली नाही असा जबाब एसीपी संजय पाटील आणि डीसीपी राजू भुजबळ यांनीही दिला आहे.


आता सीबीआयची जबाबदारी आहे की त्यांनी खुलासा करावा- नवाब मलिक

या संदर्भात बोलताना मंत्री नवाब मलिक म्हणाले की, मी आज सकाळी काही वर्तमानपत्रांमध्ये या अहवालाबाबतची बातमी वाचली आणि सोशल मीडियावर सुद्धा हा रिपोर्ट व्हायरल होतोय. आता याबाबत सत्य लोकांसमोर आणलं लोकांची मिडियाची आणि त्यांची जबाबदारी आहे. या अहवालाबाबत सीबीआय सोडून अन्य कुणी खरं की खोटं सांगू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे कागद वायरल झालेत लोक यावर विश्वास ठेवतील नाही ठेवतील माहित नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की त्यांनी या बाबतीत खुलासा केला पाहिजे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, अहवालावर सही आहे नाही आहे हा वेगळा विषय आहे. त्यांच्यावर या आधीसुद्धा आरोप झाले त्यावेळी बिनासहीची कागद फिरत होते आणि त्यानंतर सह्या समोर आला. हे कागद सत्य आहे की असत्य याचा खुलासा आता सीबीआय करू शकते. जर हा अहवाल खोटा असेल तर त्यांच्यावर चौकशी करून या मागे कोण असेल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post