राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील व्यावसायिकांना 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून अल्प दरात म्हणजे 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सामाजिक बांधिलकी म्हणून स्थानिक जिल्हा सहकारी बँका ना नफा तत्त्वावर भांडवलउभारणी खर्चापेक्षा थोडय़ा अधिक व्याजदराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करून देतील. त्यामुळे पुरामुळे बाधित झालेल्या छोटय़ा, मध्यम व्यावसायिकांना मोठी मदत होणार आहे.

या बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

z रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिह्यांतील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पात्र बाधितांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता त्यांना व्यवसाय करता यावा म्हणून स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post