आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय.



नवी दिल्ली : देशात लांब पल्ल्याचा प्रवास करताना लोक टोल नाक्यांबाबत सतत तक्रार करत असतात. कारण टोल नाक्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे त्यांना बराचसा वेळ वाया जात असतो. पण आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय. याबाबत NHAI ने दिशानिर्देशही जारी केले आहेत.इतकच नाही तर मोक्याच्या वेळीही टोल नाक्यांवर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागणार नसल्याचं NHAI ने म्हटलंय. टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागणार नाहीत.

जर कुठल्या कारणांमुळे टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा अधिक रांग लागली तर वाहनांना टोल न भरता टोल नाका पास करण्याची परवानगी दिली जाईल, असंही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटलंय.NHAI ने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता प्रत्येक टोल नाक्यावर 100 मीटर अंतरावर एक पिवळ्या रंगात रेष ओढली जाईल. देशातील प्रत्येक टोल नाक्यावर हे चित्र पाहायला मिळेल. NHAI च्या निर्णयामुळे टोक नाक्यांवर लोकांचा वेळ वाया जाणार नाही. तसंच त्यांना टोल भरण्यासाठी जास्त वेळ वाटही पाहावी लागणार नसल्याचं बोललं जात आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मार्चमध्ये लोकसभेत मोठी घोषणा केली होती. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

लोक रस्तेप्रवास जेवढा करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं होतं. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post