रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या साखळ्या तयार झाल्याची चर्चा .



 शेलपिंपळगाव -खेड तालुक्‍यातील बऱ्याच रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्‍शन अन्य ठिकाणहून आणावयास सांगितले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तब्बल 40 ते 45 हजार रुपये मोजून एक इंजेक्‍शन काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत असल्याने नातेवाइकांची धावपळ होऊन धास्ती वाढली आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या साखळ्या तयार झाल्याची चर्चा सुरू आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसागणिक अत्यंत बिकट होत चालली आहे. बेड्‌स, ऑक्‍सिजन, रेमडेसिविर इंजेक्‍शन, करोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी खेड तालुक्‍यात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला आहे.तालुक्‍याला रुग्णालयांना रेमडेसिविरचा कोटा मिळत असला तरी कोटा मिळाला नाही, असे सांगून नातेवाइकांना इंजेक्‍शन बाहेरून आणा, असे सांगितले जात आहे. मध्यरात्रीला काही डॉक्‍टर इंजेक्‍शन आणायला सांगतात. त्यामुळे नातेवाइकांना काही सुचेनासे होते. परिणामी त्यांच्यात धास्ती निर्माण होते.रुग्णालयांना रेमडेसिविरचा कोटा दिला जात आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी नातेवाइकांना इंजेक्‍शन बाहेरून घेऊन या, हे सांगणे चुकीचे आहे.

- विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी,

रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार रेमडेसिविर दिले जाते. रुग्ण ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे, त्या ठिकाणीच रुग्णांना इंजेक्‍शन दिले पाहिजे.
 

- डॉ. वैशाली वाघमारे, तहसीलदार


कोव्हॅक्‍सिन उपलब्ध होईना

करोना प्रतिबंधासाठी कोव्हॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेऊन 45 दिवस होत आले आहेत; परंतु या लसीचा दुसरा डोस कुठेच उपलब्ध नाही. त्यामुळे कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस घेतलेल्या अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.

कोणी लस देता का लस, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे म्हणाले की, लस मिळविण्यासाठी दररोज प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी धास्ती घेण्याची गरज नाही.

Post a Comment

Previous Post Next Post