कोल्हापूर जिल्हा शनिवारी (दि. 15) मध्यरात्रीपासून 8 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.



अप्पासाहेब भोसले : 

कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेत सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 15) मध्यरात्रीपासून 8 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे या बैठकीत सहभागी झाले होते.कोल्हापूर जिह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची भासणारी कमतरता पाहता, आज सकाळी ही तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तसेच वरिष्ठ सचिवांशी पालकमंत्री आणि आपण रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या पुरवठय़ाबाबत भेटलो असून, जिह्यासाठी रेमडेसिविरचा कोटा दुप्पट करत असल्याचे आणि 10 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी साखळी तोडावी लागेल. त्यामुळे जिह्यात आठ ते दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा, अशी सूचना त्यांनी केली.

आमदार राजेश पाटील यांनी यासाठी दोन-तीन दिवसांची मुदत द्यावी. दुर्गम भागात आजरा-चंदगडमधील नियोजित ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावेत, असे सांगितले. तर, आमदार ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्याच्या तर आमदार चंद्रकांत जाधव यांनी एचआरसीटी 5च्या पुढे असणाऱया रुग्णांची नावे शासनाला कळवून रेमडेसिविरची मागणी करण्याची सूचना केली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी प्रशासनाने सामाजिक संस्थांचाही सहभाग घ्यावा आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली.

जिह्याला 10 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा वाढवून मिळणार असून, लोकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

मुंबई पॅटर्नचे अनुकरण करावे - खासदार संभाजीराजे छत्रपती

n खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई पॅटर्न यशस्वी का झाला, पुण्यामध्ये चांगले यश मिळाले, याकडे लक्ष वेधून त्याचे अनुकरण जिह्यामध्ये करायला हवे. तसेच लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करून त्यानंतरचा कृती आराखडा तयार हवा, अशी सूचना केली. खासदार धैर्यशील माने यांनीही लॉकडाऊन करून कोरोना साखळी तोडणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तिसऱ्या लाटेची तयारी करत आहोत- पालकमंत्री सतेज पाटील

जिह्यात व्हेंटिलेटरची संख्या 100 वरून 400 वर पोहोचली आहे. ऑक्सिजनचा पुरवठाही वाढवतोय. त्यासाठी उद्योजकांशी चर्चा करून आमदार जाधव यांनी निर्णय कळवावा. तसेच तिसऱया लाटेची तयारीही करत असून, शेवटच्या क्षणाला रुग्ण उपचारासाठी येत असल्याने मृत्यूदर वाढत आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून मृत्यूदराबाबत कारण शोधून मार्गदर्शन केले जाईल. आरटीपीसीआर चाचणीची क्षमताही वाढवतोय. जिह्यातील नवीन ऑक्सिजन प्रकल्प 50 दिवसांत पूर्ण होतील. रविवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ. 8 ते 10 दिवसांचा लॉकडाऊन ठेवू. भाजीपाल्याबाबत नियोजन करावे. पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आदी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post