मराठ्यांना आरक्षण नाकारण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक हातकणंगले तालुका समन्वय समितीच्या ऑनलाइन बैठकीत संतप्त प्रतिक्रिया: न्याय द्या अन्यथा उद्रेकाचा राज्य व केंद्र सरकारला इशारा



हातकणंगले तालुका प्रतिनिधी : आप्पासाहेब भोसले : 

हातकणंगले दि.५ (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासूनचा प्रखर लढा, पन्नासहून अधिक तरुणांचे बलिदान आणि  लाखो समाजबांधवांच्या साठहून अधिक निघालेल्या शांततामय मोर्चानंतर मिळालेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकुनही सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी आज दिलेल्या निकाल धक्कादायक आहे. न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द ठरवले असून याप्रश्नी बाजू मांडण्यात महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरले आहे. यास केंद्र सरकारही तितकेच जबाबदार असून दोन्ही सरकारांचा आम्ही जाहीर निषेध आणि धिक्कार करीत आहोत.*

         *हातकणंगले तालुका मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत वरीलप्रमाणे संतप्त प्रतिक्रिया उमटली. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन बैठक घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील (कबनुर) यांनी स्वागत तर सचिव भाऊसाहेब फास्के (रुई) यांनी प्रास्ताविक केले. विशेष बाब म्हणून मराठा समाजास सोयी-सवलतींचा लाभ मिळवून न्याय द्यावा, अन्यथा मराठ्यांच्या संयमाचे उद्रेकात रुपांतर होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.*

          *आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या विकासाला खीळ लावणारा तसेच अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.ज्या समाजाने आतापर्यंत इतर समाजांना आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाचं काम केलं. त्यांनाच आज आरक्षण नाकारण्यात येतंय. मराठा समाजाच्या अपेक्षांचा अनादर झाला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकारण बाजूला ठेवून कायद्याच्या चौकटीत समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी जोरकसपणे करण्यात आली.*

         *यावेळच्या चर्चेत समितीचे उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, दयासागर मोरे, पंडित निंबाळकर, दीपक वाडकर, नगरसेवक दीनानाथ मोरे, सुभाष चव्हाण, अभिजित लुगडे (हातकणंगले), शिवाजी माने (भादोले), संग्रामसिंह निंबाळकर (नेज), गजानन खोत, दिलीप खोत, प्रवीण केर्ले (तारदाळ),  बी. एम. पाटील (रेंदाळ), वनिता पाटील (किणी), रमेश पाटील (कोरोची), पुंडलिक बिरंजे, अमित गर्जे (आळते), सुनील काटकर (रांगोळी), विकास संकपाळ (इंगळी) आदींनी भाग घेतला.*

Post a Comment

Previous Post Next Post