राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची 18 एकर भूखंडप्रकरणी वादातूनच हत्या .



 नगर : "राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे शहरातील 18 एकर भूखंडप्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हण्याची या भूखंडात मालकी आहे. त्यामुळे याप्रकरणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांची चौकशी करावी,'' अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाविषयी भूमिका मांडली. ते म्हणाले, ""शहरातील मोक्‍याच्या भूखंडांवर प्रथम आरक्षण टाकले जाते.त्यानंतर त्या मालकांशी संपर्क करून जागेचा व्यवहार करायचा आणि आरक्षण उठवायचे, असा काही सत्ताधाऱ्यांचा धंदा झाला आहे. राहुरी नगरपालिकेने मोक्‍याच्या 18 एकर जागेवर शैक्षणिक आरक्षण टाकले होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा सोहम, मेव्हणा सुचित देशमुख यांची या जागेत मालकी आहे. या जागेपैकी मालक असलेले पठारे यांनी "पॉवर ऑफ ऍटर्नी' करून पत्रकार दातीर यांना कायदेशीर लढण्याचा अधिकार सुपूर्द केला होता. दातीर यांनी या जागेबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. कान्हू मोरे याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. या जागेच्या वादातूनच पत्रकार दातीर यांची हत्या झाली.''

दातीर यांचे अपहरण झाल्यावर त्यांच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या अपहरणाचा गांभीर्याने तपास केला नाही. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी राहुरी पत्रकार परिषदेत दातीर यांची हत्या जागेच्या व्यवहारातून झाल्याचे सांगितले आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांनी हत्या करण्याचे धाडस केले. या गुन्ह्यातील आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे, या जागेच्या सर्व मालकांना या गुन्ह्यात आरोपी करावे, या मागणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे,'' असेही कर्डिले म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post