फोन टॅपिंग गोपनीय अहवाल फुटलाच कसा ? याचा आता मुंबई पोलीस तपास करणार




फोन टॅपिंग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या कथित बदल्यांचा गोपनीय अहवाल फुटलाच कसा याचा आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत. गोपनीय पत्र व इतर तांत्रिक माहिती बेकायदेशीरपणे घेऊन ती 'लीक' केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करून त्याचा अहवाल तसेच वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्यांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे दिला होता. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना तो अहवाल तसेच राज्य गुप्तवार्ता विभागातील त्यासंबंधीचा तांत्रिक अहवाल आपल्याकडे पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे जाहीर त्यामुळे राज्य गुप्तवार्ता विभागाचा गोपनीय अहवाल तसेच गोपनीय तांत्रिक माहिती त्या विभागातून बाहेर आलीच कशी? हा गोपनीय अहवाल कोणी काढून घेतला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोपनीय अहवाल अशा प्रकारे चोरून तो सार्वजनिक करणे गुन्हा असल्याने त्याची राज्य गुप्तवार्ता विभागाने गंभीर दखल घेत तक्रार दिल्यानंतर मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात कलम 30 भारतीय टेलिग्राम अॅक्ट 1885, माहिती-तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 43 (ब), 66 सह द ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1923 च्या कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक आयुक्त या गुह्याचा तपास करीत असून राज्य गुप्तवार्ता विभागातून गोपनीय अहवाल चोरणारा तो कोण ? याचा आता कसून शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

इंडियन टेलिग्राफ अॅक्टखाली देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविणाऱया कृत्यावर नजर ठेवता यावी व वेळीच असे षड्यंत्र मोडून काढणे याकरता फोन टॅपिंगची परवानगी देता येते. राजकीय मतभेद, व्यावसायिक तंटे, कौटुंबिक कलह अशा स्वरूपाच्या प्रसंगामध्ये या तरतुदीचा वापर करता येत नाही. मात्र रश्मी शुक्ला यांनी मूळ उद्देशापेक्षा वेगळय़ा कारणांसाठी उपरोक्त तरतुदींचा गैरवापर करुन शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी अहवालात ठेवला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post