हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात पालिकेचा अतिक्रमण विभाग सफसेल नापास .



पुणे :  -
 हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात पालिकेचा अतिक्रमण विभाग सफसेल नापास झाला आहे. खच्चून गर्दी, वाहनचालकांना तारेवरची कसरत, अपघातसदृशस्थिती अशा तक्रारी वारंवार करूनही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता उड्डाण पुलाखालील जागेमध्ये फेरीवाले, पथारीवाले, हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते बसवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करणे हाच काहीसा पर्याय ठरू शकेल, अशी सूज्ञ नागरिकांची मतमतांतरे आहेत. त्याला फेरीवाले-भाजीविक्रेत्यांचीही संमती असल्याचे दिसत आहे.

बायडाबाई साळुंके, रतन धुमाळ, तमन्ना माळी, कमल लोखंडे, सुरेखा वाघमारे, पांडुरंग सागरे आणि नागे यांच्यासह अनेक भाजीविक्रेते मागिल 15 वर्षांपासून भाजीविक्री व्यवसाय करीत आहेत.दहा-बारा वर्षांपूर्वी फेरीवाले, पथारीवाले आणि भाजीविक्रेत्यांनाही उड्डाण पुलाखाली बसविले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला कोणताही अडथळा होत नव्हता. मात्र, सायंकाळच्या वेळी उड्डाण पुलाखाली ग्राहक मिळत नसल्याने एक एक करून फेरीवाले, भाजीवाले रस्त्यावर येऊ लागले. उड्डाण पुलाखाली बीआरटी बसेससाठी मार्ग केला. मात्र, पीएमपी बसेस अवघ्या 50-60 मीटर जागेत धावतात. इतर जागेमध्ये टेम्पो आणि खासगी वाहने उभी केली आहेत. उड्डाण पुलाखाली जागा मिळाली तर उन, वारा, पावसापासून संरक्षण होईल. रस्ताही वाहतुकीसाठी खुला होईल, त्यासाठी पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सीमा सावंत यांनी केली आहे.

मागिल काही वर्षांपूर्वी फेरीवाले-पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते उड्डाण पुलाखाली बसविले होते. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, पळा पळा पुढे कोण असे म्हणत या मंडळींनी पुन्हा पदपथ आणि रस्त्यावर बस्तान बसविले आहे. त्यामुळे आता हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान सोलापूर महामार्ग नाही, तर अघोषित फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांसाठी अधिकृत तळ बनविला आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचे बगलबच्चे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे आणि मूकसंमतीमुळे त्यांची दादागिरी वाढली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पालिकेने अ, ब, क, ड या प्रमाणे कितीजणांना परवाने दिले आहेत आणि कितीजण बिगर परवान्याने बसत आहेत. या ठिकाणी शेतकरी म्हणून किती भाजीविक्रेते आहेत, खरोखर शेतकरी आहे का, शेतकरी शेतमाल पिकवणार का, दिवसभर भाजीपाला विकणार, एका शेतकऱ्याकडे सर्व प्रकारचा भाजीपाला असतो का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण बहुतेक भाजीविक्रेते पं.नेहरू भाजीमंडईमधील आहेत. पालिेकेने अ,ब,क,ड परवाना दिला आहे, तो वाहतुकीला किंवा नागरिकांना कोणताही अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी त्यांनी व्यवसाय करायचा आहे, असे ते प्रमाणपत्र आहे. मात्र, या ठिकाणी सर्रास वाहतूक आणि नागरिकांना अडथळा होत आहे, तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. अतिक्रमण विभाग सुस्त आणि जनता मात्र त्रस्त अशी स्थिती आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे स्थानिकांनी वारंवार तक्रार केली आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जेव्हा अतिक्रमणे नसतात, त्यावेळी कारवाईसाठी येतात. भाजीविक्रेते सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी रस्त्यावर गर्दी करतात. त्यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी घरी असतात. जेव्हा विक्रेते आराम करतात, त्यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाची वाहने आणि कर्मचारी पुलाच्या बाजूला उभी करून झोपा काढतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा ठरवता येत नाहीत किंवा मुद्दाम केले जात असावे, असाच निष्कर्ष निघत आहे. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण, पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करणे ही अत्यंत गरजेची बाब बनली आहे.

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा सावंत म्हणाल्या की, पदपथ आणि रस्त्यावर फेरीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला विक्री करणाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले पाहिजे. कॅम्पमधील एम.जी. रस्त्यावरील पथारीवाल्यांना कांबळी मैदान येथे हलवून रस्ता मोकळा केला. त्याप्रमाणे हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक दरम्यानच्या पदपथ आणि रस्त्यावरील पथारीवाले, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेत्यांना उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत बसवून व्यवसाय करू द्यावा. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दक्षता घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post