स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिल्याने कर महसुलात वाढ

 

राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिल्याने कर महसुलात वाढ.PRESS MEDIA LIVE :

मुंबई - राज्य सरकारने घर खरेदीदारांसाठी स्टॅम्पड्युटी मध्ये मागील चार महिन्यांसाठी मोठी सवलत जाहीर केली होती. त्यातून घर खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात नोंदवले गेले आणि त्यामुळे राज्याच्या महसुलात तब्बल 367 कोटी रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनाला आले आहे. राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या अवधीत स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के सवलत जाहीर केली होती.

या संबंधात पत्रकारांना माहिती देताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने चार महिन्याच्या कालावधीत ही सवलत जाहीर केली होती. सध्या शहरी भागात घरे खरेदी करणाऱ्यांना सहा टक्के दराने आणि ग्रामीण भागात पाच टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागते.या चार महिन्याच्या अवधीत दोन्ही ठिकाणी तीन टक्के दरानेच मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. त्याचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. या चार महिन्याच्या अवधीत नेहमीपेक्षा सुमारे 4 लाख 11 हजार जादाचे व्यवहार नोंदवण्यात आले. त्यातून राज्य सरकारला एकूण 367 कोटी 73 लाखांचा जादा महसुल मिळाला आहे.


सप्टेंबर ते डिसेंबर 2019 मध्ये राज्यात एकूण 8 लाख 44 हजार 636 व्यवहार रजिस्टर झाले होते, तर सप्टेंबर ते डिसेंबर 2020 मध्ये 12 लाख 56 हजार 224 व्यवहार रजिस्टर झाले आहेत असे थोरात यांनी सांगितले. या वाढीव व्यवहारातून एकूण 9 हजार 622 कोटी 63 लाख रूपयांचा महसुल जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळातील महसुलापेक्षा तो 367 कोटी 73 लाखांनी अधिक आहे.


Post a comment

0 Comments