मराठा आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आज सुरु होणार नवी दिल्ली :

मराठा आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आज सुरु होणार आहे. सुनावणीसाठी २५ जानेवारी ही तारीख आधी निश्चित केली होती. मात्र हे प्रकरण आज (दि.२०) सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. ही सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार आहे. 

मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने याआधीच्या सुनावणीवेळी नकार दिला होता. स्थगिती पूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला देखील न्यायालयाने परवानगी दिलेली नाही.याआधीही काही राज्यांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला होता.तथापि आरक्षणाच्या अनुषंगाने कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. या प्रकरणाची नियमित सुनावणी जानेवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यापासून सुरु होईल, असे घटनापीठाकडून सांगण्यात आले होते. आम्ही कोणतीही भरती थांबविण्यास नकार दिलेला नाही. पण मराठा आरक्षण कायद्यानुसार भरती केली जाऊ नये, असे निर्देश घटनापीठाने दिले होते.

मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. अब्दूल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र भट या पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी होत आहे.

Post a comment

0 Comments