एक म्हणतोय मी पुन्हा येईन तर दुसरा म्हणतोय मी पुन्हा जाईन


अजित दादांना पहाटे त्यांच्या सोबत आणलेले 28 आमदार त्यांना का टिकवता आले नाहीत.

चंद्रकांत पाटील


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी :

पुणे : भाजपचे अनेक नेते आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोडून काढला आहे. अजितदादांना पहाटे त्यांच्यासोबत आणलेले 28 आमदार त्यांना का टिकवता आले नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले नेते पुढील तीन ते चार महिन्यांत राष्ट्रवादीत परततील, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मोठ्या प्रमाणात नेते भाजपमध्ये आयात करण्यात आले होते. भाजप सत्तेत येईल आणि आपल्या भागातील विकासाला गती मिळेल, या आशेने ते तिकडे गेले होते.आता ते नेते निराश झाले आहेत. त्यांना त्यांच्या भागात कोणत्याही योजना राबवता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते आता परतण्याच्या तयारीत आहेत.

याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत 28 आमदार असल्याचा दावा करण्यात आला होता. याचा संदर्भ देऊन पाटील म्हणाले की, अजितदादांची एवढी ताकद होती तर त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले 28 आमदार का सोबत राहिले नाहीत? ते आमदार त्यांना टिकवता आले नाहीत आणि ते दुसरीकडून कुठून आमदार आणू शकतात.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काल अटल गौरव पुरस्कार कार्यक्रमात मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे, माझ्या विरोधकांनी हे लक्षात घ्यावे, असे वाक्य उच्चारले होते. चंद्रकांतदादा हे गमतीने बोलले होते. त्यावर टाळ्याही झाल्या. मात्र त्या वाक्याचे राजकीय पडसाद उमटल्याशिवाय राहिले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. एक म्हणतोय मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतोय मी पुन्हा जाईन. पण तुम्हाला कोणी बोलावले होते, अशी विचारणा करत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि पाटील दोघांवरही टीका केली.

त्यानंतर चार तासांनी चंद्रकांत पाटील यांनी आपण लगेच कोल्हापूरला जाणार नसल्याचे सांगत आपले मिशन अद्याप पूर्ण व्हायचे आहे, असे सांगितले. त्यांनी त्यासाठी पुण्यातील पत्रकारांनी आपल्या पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महात्मा सोसायटीतील घरी पत्रकार परिषदेसाठी बोलविले होते. चंद्रकांतदादांच्या या खुलाशानंतर ते पुढील काही काळ तरी पुण्यातच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. कारण राजकीय नेत्यांसाठी तसे निवृत्तीचे वय ठरलेले नसते.


Post a comment

0 Comments