फुरसुंगी देवाची उरळी पाणी प्रश्न लवकरच सुटणार.

 फुरसुंगी देवाची उरळी  पाणी प्रश्न लवकरच सुटणार. 

नगरसेवक गणेश ढोरे.

PRESS MEDIA LIVE : 



फुरसुंगी - फुरसुंगी-उरुळी देवाची येथील 93 कोटी रुपयांच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे पाच वर्षांपासून रखडलेले काम संरक्षण विभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी मिळाल्याने पूर्ण होणार आहे. यामुळे या गावची गेल्या 20 वर्षांपासूनची पाण्यासाठीची भटंकती थांबणार आहे. कचरा डेपोमुळे या भागातील सर्व जलस्रोत दूषित झाले आहेत, त्यामुळे गावांमध्ये बारमाही पाणीटंचाई भासत होती. आता, ही पाणीयोजना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या गावांना लवकरच पुरेसे शुद्ध पाणी मिळणार आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की, फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन्ही गावे गेल्या 20 वर्षांपासून कचराडेपोच्या नरकयातना भोगत आहेत.कचरा डेपोमुळे या भागातील कुपनलिका,विहिरी असे सर्व नैसर्गिक जलस्रोत दूषित झाल्याने या भागात बारमाही पाणीटंचाई भासते. पालिकेकडून टॅंकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा खूपच अपुरा व अनियमित असल्याने येथील नागरिक पाण्यासाठी रात्री-अपरात्री जीव धोक्‍यात घालून पाण्यासाठी भटकंती करतात.

या भागासाठी मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 93 कोटी रुपयांची फुरसुंगी-उरुळी देवाची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले. या योजनेतील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. फुरसुंगी व उरुळी देवाची भागात पाण्याच्या टाक्‍यांची कामे, जलवाहिन्या टाकण्याची कामे, मुख्य वाहिनी टाकण्याचे कामे प्रगतीपथावर होते. परंतु, संरक्षण विभागाच्या 800 मीटर जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने हे काम गेल्या साडेपाच वर्षांपासून रखडले होते.

रखडलेले हे काम पूर्ण होऊन पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह दिल्लीला जाऊन लेखी पत्र व कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला. खासदार सुळे यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या योजनेला संरक्षण विभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता या योजनेची रखडलेली सर्व कामे पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करून उरूळीदेवाची-फुरसुंगी पाणीयोजनेचे काम तातडीने पूर्णत्वास नेऊन येथील भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असून पुढील कार्यवाहीसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले.

फुरसुंगी-उरुळी देवाची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार संजय जगताप, आमदार चेतन तुपे, स्थानिक पदाधिकारी व प्राधिकरणचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळेच आपण या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करू शकलो. ही योजना योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्यासाठीची नागरिकांची भटंकती संपणार आहे.

- गणेश ढोरे, नगरसेवक (11 गावे)

Post a Comment

Previous Post Next Post