लाच खोरी...


 

लाचखोरीचे प्रमाण भारतात अधिक


PRESS MEDIA LIVE : 


नवी दिल्ली : संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक लाचखोर लोक भारतात आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सर्व्हेक्षणामधून ही बाब समोर आली आहे. या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावले उचलत असल्याचे या सर्व्हेत सहभागी झालेल्या ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. भारतात ४६ टक्के लोक आपले काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे ३२ टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी जर असे केले नाही तर त्याचे काम होतच नाही.

भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात ३७ टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचे प्रमाण ३० टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 'ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया' या नावाने आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये १७ देशांतून २०,००० लोकांना प्रश्न विचारण्यात आले. हा सर्व्हे जून आणि सप्टेंबर या महिन्यांदरम्यान करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चार लोकांपैकी तीन जणांनी त्यांच्या देशात भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.

भारतात ज्या लोकांचा सर्व्हेमध्ये समावेश होता. यांपैकी ४२ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली आहे. सरकारी ओळखपत्र मिळवण्यासाठी ४१ टक्के लोकांना लाच द्यावी लागली. अहवालात या गोष्टीचाही खुलासा करण्यात आला की, ६३ टक्के लोकांना भ्रष्टाचाराची माहिती देण्यास भीती वाटते. तर आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर १० टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये १२ टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

Post a comment

0 Comments