घोळ असल्याचा आरोप.

 माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत घोळ असल्याचा आरोप

सदस्य संपदा देसाई यांनी केला आरोप


PRESS MEDIA LIVE :  सिंधुदुर्गनगरी ता ०५

     प्रसाद पाताडे


माध्यमिक शिक्षण माहिती ( कागदपत्रे) या विभागाकडे नसल्याचे सांगितले जाते यावरून माध्यमिक विभागाच्या कार्यपद्धतीत घोळ असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संपदा  देसाई यांनी सभेत केला

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समिती सदस्य सरोज परब, विष्णुदास कुबल, सुधीर नकाशे,  संपदा देसाई आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षण विभाग संबंधित मागील दोन सभांमध्ये सदस्य संपदा देसाई यांनी मागितलेली माहिती वारंवार आठवण करूनही देण्यात आलेली नाही. आजच्या सभेत हा विषय चर्चेला आला मात्र माध्यमिक विभागाचे अधिकारी सभेस उपस्थित राहिले नाहीत. याबाबत संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माध्यमिक शिक्षक विभागाकडून कोणतीही माहिती वेळेत मिळत नाही चुकीची व दिशाभूल करणारी आणि थातूरमातूर उत्तरे दिली जातात. 29 वर्ष सेवा बजावलेल्या एका कर्मचाऱ्याची माहिती मागितली असता या विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जाते यावरून या विभागाच्या कार्यपद्धतीत घोळ असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप सदस्य संपदा देसाई यांनी  शिक्षण समिती सभेत केला. तर पुढील सभेपूर्वी मला माहिती मिळावी अशी सूचना यावेळी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्राथमिक शाळा नादुरुस्त आहेत. त्यापैकी प्राधान्यक्रमाने २७६ शाळांची कामे मंजूर असून १३५ कामे अद्यापही निविदा प्रक्रियेत अडकली  असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तर ज्या  कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत ती कामे तात्काळ पूर्ण करा. निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून तत्काळ उर्वरित कामांना कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू करावी असे आदेश सभापती सावी लोके यांनी संबंधित विभागांना दिले.

केंद्रप्रुखांची रिक्त पदे कार्यरत शिक्षकातून भरण्यात येणार आहेत. तर सद्यस्थितीत ३५६ पदे उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांची रिक्त असल्याची माहिती सभेत देण्यात आली असता शिक्षकांची सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.

कोरोनाच्या काळात गेले ७ ते ८ महिने प्राथमिक शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत तर उर्वरित मुलाना  'शाळा बाहेरील शाळा' उपक्रम राबवून प्रत्यक्ष वस्त्यावर शिक्षण दिले जात आहे अशी माहिती सभेत देण्यात आली. याला सदस्य विष्णुदास कुबल,सुधीर नकाशे यांनी आक्षेप घेत अद्यापही ग्रामीण भागातील काही मुले शिक्षण प्रवाहात आलेले नाहीत, त्याचे काय करणार ?  ज्या गावात कोव्हिडचा प्रादुर्भाव नाही अशा गावातील शाळा सुरू करण्याबबत नियोजन करा त्यासाठी आवश्यक उपाययोजना करा आठवड्यातून किमान दोन तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करणे आवश्यक असल्याची सूचना केली. या बाबत केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post