राष्ट्रवादीवर पलटवार

 महापौरांचा राष्ट्रवादीवर पलटवार




PRESS MEDIA LIVE : पिंपरी :

पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड-19 रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून महापालिकेच्या वतीने प्रयत्न सूरू आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर उपचार सूरू आहेत. कोरोनाची जबाबदारी ओळखुन आजपर्यंत महापालिकेने जवळपास 150 कोटींचा निधी खर्च केला आहे. मात्र, राज्य शासनाकडून आतापर्यंत दीड कोटी रुपयांचाच निधी महापालिकेला मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांकडून सतराशे कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जात असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा पलटवार महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी केला आहे.कोरोना काळात सत्ताधारी भाजपाने काटेकोरपणे नियोजन केल्याने पिंपरी-चिंचवड मनपाचे काम कौतुकास्पद राहीले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महापालिकेस भेट देत तब्बल ४०मिनिट पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे नियोजनाबाबत माहिती घेत कौतुक केले. तसेच जम्बो रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या कोविड रुग्णांसाठी केलेल्या उपाययोजना सर्व महापालिकांनी राबवाव्यात असे सांगितले. असे असताना देखील आपल्या वरिष्ठांनी महापालिकेच्या केलेल्या कौतुकावर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर शहराच्या कोविड नियोजना संदर्भात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रातील कोविड रुग्णांबरोबरच हद्दीबाहेरील व ग्रामीण 40% भागातील रुग्णांवर मनपामार्फत उपचार सुरु आहेत. तसे पाहिले तर ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. असे असतानासुध्दा मानवतेच्या दृष्टीकोनातून मनपा ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देत आहे. या विषयावर देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. तसेच शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करावा.

शहरात कोविड रुग्णांसाठी पाच हजारहून अधिक बेड आहेत. जिल्ह्याची कोरोना रुग्णांची परिस्थिती काय आहे. राज्य शासनाने अण्णासाहेब मगर स्टेडीयमवर उभारलेल्या जम्बो रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे लक्ष न देता राष्ट्रवादीचे पदाधिकारी टीका टिप्पणी करण्यावर भर देत आहे. जम्बो रुग्णालयावर महापालिकेचे नियंत्रण असल्यामुळेच त्या ठिकाणची परिस्थिती सुरळीत आहे. त्यावर नियंत्रण नसते तर पुण्याच्या जम्बो हॉस्पिटल सारखी परिस्थिती या ठिकाणी पहावयास मिळाली असती हे देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विसरुन चालणार नाही.

आमच्यावर टिका करण्यापेक्षा राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या जम्बो सारख्या रुग्णालयाच्या समस्या काय आहेत, रुग्णांची व्यवस्था कशी आहे, ऑक्सिजन मध्ये येणारा तुटवडा, त्यावरील नियंत्रण, जुना जम्बो ऑक्सिजन टँक खरेदी करुन त्यामध्ये वारंवार फ्लो नियंत्रित न होण्याचे वाढते प्रमाण, ऑक्सिजन बेडची संख्या किती आहे याची चौकशी करुन त्या ठिकाणी लक्ष देण्याचे काम करावे.

कोविड काळात शासनाने दिलेले 33% निधीच वापरण्याचे निर्देश काढून राज्य शासनावर कुठलाही भार न देण्याच्या अटीस अधिन राहुन राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून पाणीपुरवठा, ड्रेनज, रस्ते इ. च्या विकास कामांसाठी 1700 कोटी रुपये स्वायत्ता मंजुर केली आहे. परंतु हा 1700 कोटीचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोविड उपाययोजनांसाठी मिळाल्याचा खोटा गवगवा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी सुरु केला आहे.

मात्र राज्य शासनाकडून कोविड उपाययोजनेसाठी फक्त दीड कोटी रुपये महापालिकेस मिळाले असून 1700 कोटी कसे व कोठून आले याची माहिती देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर जी जबाबदारी राज्य शासनाने घ्यायला हवी होती ती महापालिकेने पार पाडली आहे, याची देखील दखल या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे महापौर व पक्षनेते यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post