पुणे लेटेस्ट न्यूज :


हवेली, मुळशी बाजार समितीचे आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याचा मार्ग मोकळा.

PRESS MEDIA LIVE :. पुणे :

लोणी काळभोर -गुलटेकडी येथील पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृतरित्या विभाजन झाल्याची घोषणा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बुधवारी (दि. 9) केली आहे. या घोषणेमुळे हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन व्हावे यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी मागील आठ महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

दरम्यान पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनामुळे यापुढील काळात गुलटेकडी येथून पुर्वीप्रमाणेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हाकला जाणार आहे. यामुळे तब्बल 16 वर्षांच्या वनवासानंतर हवेलीकरांना सभापती, उपसभापती व संचालक म्हणून बाजार समितीच्या कार्यालयात जाणार असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे.

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमितता असल्याच्या कारणावरुन, सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून बाजार समितीवर प्रशासक नेमला होता.त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात तब्बल दहा वर्षे विविध कारणे पुढे करत प्रशासक कारभार पाहत होता; मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हवेली व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करून, पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली. यास हवेली व मुळशी तालुक्‍यातील जनतेचा मोठा विरोध होता.

दरम्यान वर्षभरापुर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताच, आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन रद्द करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. या मागणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ग्रीन सिग्नल दिला होता.

याबाबत आमदार अशोक पवार म्हणाले, हवेली तालुक्‍यातील शेतकरी व नागरिकांनी हवेलीसाठी पूर्वीसारखीच स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असावी यासाठी आग्रह धरला होता. राज्यात प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात असतांना, फडणवीस सरकारने मात्र स्वतःच्या फायद्यासाठी हवेली व मुळशी या तालुक्‍यावर अन्याय करुन, दोन्ही तालुक्‍यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समित्या एकत्रित केल्या होत्या.

हवेलीकरांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालयात तीन महिन्यांपूर्वी आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे पुर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची विनंती केली होती. यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठींबा दिल्याने, वरील निर्णय घेण्यात
आला आहे.

मागील सोळा वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक काम पाहत आहे. यामुळे तालुक्‍यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. बाजार समितीवर अधिक काळ प्रशासक न राहाता, बाजार समितीची सत्ता लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती यावी, यासाठी संचालक मंडळाची निवडणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली

Post a comment

0 Comments