डॉ. विकास पाटील यांचा क्रांतिकारी निर्णय



 कालबाह्य तेराव्याचा कार्यक्रम अमावस्येला पाचव्या दिवशी करून पाटील बंधूनी समाजाला दिली दिशा! प्रा.विनोदसिंह आणि डॉ.विकास पाटील यांचा क्रांतिकारी निर्णय!

सैनिक टाकळीत शिवधर्मानुसार केले मृत्योत्तर संस्कार!

PRESS MEDIA LIVE :

प्रतिनिधी:

माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार होतात. मृत्युनंतर देखील विविध संस्कार केले जातात. पूर्वीपासून चालत आले आहे, म्हणूनही काही कालबाह्य संस्कार तसेच पुढे चालवत असतात. मात्र सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे स्मृतिशेष भाई विलासराव पाटील यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पुरोगामी निर्णय घेत, शिवधर्म पद्धतीने केले सर्व मृत्युत्तर संस्कार!

ज्येष्ठ पुरोगामी, शेकाप नेते, महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातील सेनानी, सहकार, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अग्रणी, भाई विलासराव पाटील आण्णा यांनी देहदानाचा संकल्प केला होता. तशी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांनाही त्याची कल्पना दिली होती. पण  कोविड-19 ची पार्श्वभूमी आणि कर्करोगाने झालेले निधन, यामुळे देहदान करता आले नाही. अंत्ययात्रेवेळी त्यांचा मृतदेह शेकापच्या लालबावट्यामध्ये  लपेटला होता. अंत्ययात्रेवेळी त्यांच्या मुलांनी बोंब न मारता "भाई विलास अण्णा अमर रहे!" "भाई विलास आण्णाना अखेरचा लाल सलाम!" अशा घोषणा दिल्या. अंत्ययात्रेत मृतदेह चार जणांच्या खांद्यावरुन न नेता ट्रॅक्टर- ट्रॉलीमधून नेला. स्मशानभूमीत गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी जिजाऊ वंदना म्हणून भडाग्नी दिला. यावेळी शिवांजलीसभेचे आयोजन केले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी गावच्या वतीने आदरांजली व्यक्त केली. तर त्यांच्या मुलांनी भाई विलासअण्णा यांच्या सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आठवणींना उजाळा देऊन सर्वांनी  व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. 

रक्षाविसर्जन वेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांच्या रक्षा व अस्थीचे पारंपारिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्यांच्या अस्थीचे पूजन करून व शेतात पुरून, त्याच ठिकाणी वृक्षारोपण करून, त्यांची आठवण जपण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला आहे. तसेच स्मशानभूमीत नैवद्य ठेवला नाही, की कावळ्याची वाट बघितली नाही. या कृतीतून प्रेरणा घेवून त्यादिवशी त्याठिकाणी झालेले इतर दोन रक्षाविसर्जन सुद्धा नैवेद्याशिवाय व कावळ्याची वाट न पाहता पार पडले.

तसेच परंपरागत दहावीचा विधी, मुंडन व पिंडदान अशी कर्मकांडे नाकारून फक्त जिजाऊ वंदना म्हणण्यात आली.

इतकेच नाही तर निधनानंतर तेरा दिवस सुतक न पाळता पाचव्या दिवशीच शिवधर्म पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पाडले.

बाराव्या दिवशी होणारा उत्तरकार्याचा कार्यक्रम, त्याचा कालावधी कमी करून अगदी अमावस्या असतानाही पाचव्याच दिवशी शिवधर्मानुसार  पूर्ण केला. यावेळी त्यांच्या पत्नी विश्वलता पाटील आणि सर्व कुटुंबियांच्या वतीने भाई विलास आण्णा, त्यांचे आई वडील व आजी आजोबा यांच्या प्रतिमा तसेच राजमाता जिजाऊ, छ. शिवराय,छ.शंभूराजे, राजर्षी छ. शाहूजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी डॉ. दिलीप धानके लिखित "पितृ महिमा" या काव्यात्मक ग्रंथाचे तसेच अँड. के. डी. शिंदे यांच्या "मराठा समाज आणि अंधश्रद्धा" या लेखाचे वाचन डॉ. विकास पाटील यांनी केली. याठिकाणी प्रबोधन पुस्तक एक्सप्रेसचे ग्रंथप्रदर्शनही आयोजित केले होते. यावेळी आलेल्या सर्व पाहुणेमंडळी, भाऊबंद आणि मित्र परिवारांना पुरोगामी, परिवर्तनवादी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच कालबाह्य गोडाचा (तेरावी) कार्यक्रम रद्द करण्यात आला.याकामी बाळासो पाटील,हणमंत पाटील यांचे सहकार्य लाभले.

अंत्यसंस्कार आणि मृत्यू संस्काराचे सर्व कार्यक्रम मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.विकास पाटील यांनी पार पाडले.

 भाई विलासराव पाटील यांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता, शेतात पुरून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुले प्रा. विनोदसिंह, डॉ. विकास, भाऊ बाबासाहेब पाटील, जावई सुहास पाटील, विक्रम देसाई आणि विशाल देसाई इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post